नैसर्गिक संकटासह परकीय बोटींच्या घुसखोरीचा फटका
रत्नागिरी:- नैसर्गिंक संकटाबरोबरच परराज्यातील हायस्पीड नौकांकडून होत असलेल्या मासेमारीचा फटका स्थानिक मच्छीमारांना बसत आहे. वार्यामुळे काही नौका समुद्रातच गेल्या नाही. परिणामी मच्छी विक्रेत्यांकडे मासळीचा अभाव होता. रापणीला मिळणार्या मासळीवरच खवय्यांना अवंलबून रहावे लागत आहे.
गेले दोन दिवस कोकण किनारपट्टीवर वेगवान वारे वाहत आहेत. बदलत्या वातावरणामुळे मासळीही म्हणावी तशी मिळत नाही. गेले दोन दिवस पाहीजे तशी मासे विक्रीसाठी उपलब्ध झालेेले नाहीत. अनेक नौका बंदरातच उभ्या आहेत. समुद्रात मासेच मिळत नसल्याने छोट्या मच्छीमारांनी किनार्यावरच राहणे पसंत केले आहे. विक्रीसाठी रापणीसह खाडीला मिळणार्या माशांवरच अवलंबून रहावे लागत आहेत. त्यातही बांगडी 200 रुपये तर मुळे 100 रुपये शेर अशा दराने बाजारात मिळत आहेत. ही परिस्थितीत परराज्यातील हायस्पीड नौकांच्या घुसखोरीमुळे होत आहे. पूर्णगडपासून दाभोळ, श्रीवर्धन पर्यंत दोनशे ते अडीचशे हायस्पीड नौका मासेमारीसाठी येत आहेत. म्हाकुळ, बांगडा, सुरमई सारखी सोनेरी मासळी त्यांच्या जाळ्यात मिळत असल्याने स्थानिकांवर उपासमारीची वेळ येत आहे. त्यांच्यावर कारवाईसाठी नुकतेच मच्छीमारी संघटनांकडून मत्स्य विभागाला निवेदनही दिलेले आहे.









