माळनाका येथे रिक्षाच्या धडकेत ८ वर्षांचा मुलगा जखमी

शिर्के हायस्कूलच्या प्रवेशद्वारासमोर अपघात

रत्नागिरी:- रत्नागिरी शहरातील शिर्के हायस्कूलच्या गेट क्रमांक २ समोर रस्ता ओलांडणाऱ्या एका ८ वर्षीय बालकाला रिक्षाने जोरदार धडक दिली. या अपघातात रुद्र अवधूत आमकर हा मुलगा जखमी झाला असून, रिक्षाचालकाविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना २३ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी ५:३० वाजेच्या सुमारास माळनाका ते सन्मित्रनगर या मार्गावर घडली. जखमी रुद्र आमकर हा शिर्के हायस्कूलच्या गेट क्रमांक २ समोरून रस्ता ओलांडत होता. याच वेळी माळनाका बाजूकडून संमित्रनगरच्या दिशेने जाणारी रिक्षा (क्रमांक: एमएच ०८ बीसी ०८०४) वेगाने आली. रिक्षाचालकाने निष्काळजीपणे रिक्षा चालवून रुद्रला धडक दिली. या धडकेत रुद्रला दुखापत झाली आहे.

​याप्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार उमेश कृष्णा पवार यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार रिक्षाचालक प्रकाश दत्ताराम मांडवकर (वय ६३, रा. सुपलवाडी, रत्नागिरी) याच्यावर भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम २८१, १२५(अ) आणि मोटार वाहन कायद्याच्या कलम १८४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

​शाळेच्या प्रवेशद्वारासमोरच हा अपघात घडल्याने पालक आणि नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे. शाळा सुटण्याच्या किंवा भरण्याच्या वेळी या मार्गावर वाहनांचा वेग मर्यादित असावा, अशी मागणी स्थानिक रहिवाशांकडून केली जात आहे.