माल उचलायचा नाही तसेच माल उतरवू द्यायचा नाही; वाहतूकदार आक्रमक

रत्नागिरी:- वाहतूकदारांना ठरविण्यात आलेले दरही व्यवस्थित दिले जात नाहीत, वेळ देऊनही कंपनीतील वाहतूक विभागाचे अधिकारी ट्रक व्यावसायिकांच्या समस्या जाणून घेेण्यास येत नसल्याने वाहतूकदारांनाी रत्नागिरीतील प्रसिध्द सिमेंट कंपनीमधून माल उचलायचा नाही व माल उतरवू द्यायचा नाही असा निर्णय घेत कंपनीशी निघडीत माल वाहतूक बंद केली. त्यामुळे कंपनीच्या गेटबाहेर ट्रकची मोठी रांग लागली होती. यावेळी जिल्हा वाहतूक संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी जोरदार घोषणाबाजी केली.

रत्नागिरी जिल्हा मोटर मालक संघाचे उपाध्यक्ष बंड्या साळवी, चिटणीस दीपक साळवी, रोशन फाळके, विलास मुळ्ये, अल्ताफ संगमेश्वरी यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी साळवी स्टॉप येथील कार्यालयात गोळा झाले होते. यानंतर सर्व पदाधिकारी व ट्रक मालक यांनी उद्यमनगर येथील सिमेंट कंपनीत जाऊन अधिकार्‍यांची भेट घेतली. परंतु कंपनीचे वाहतूक विभागाचे वरिष्ठ अधिकारी मात्र यावेळी अनुपस्थित होते. बुधवारी सकाळी 11 वाजता भेटण्याचे आश्वासन त्यांनी वाहतूकदार संघटनेच्या पदाधिकार्‍यांना दिले होते. परंतु ते रत्नागिरीत फिरकलेच नाहीत. त्यामुळे पदाधिकारी संतप्त झाले होते.

त्यामुळे कंपनीत माल घेऊन येणारे ट्रक आणि कंपनीतून माल उचलणारे ट्रक गेटजवळच थांबवत माल उतरु किंवा गाडीत चढवू देणार नसल्याचा इशारा त्यांनी दिला. कंपनीच्या वाहतूक विभागाच्या अधिकार्‍यांना ट्रक मालक व वाहतूकदारांना भेटायचे नसल्याने त्यांनी भेट टाळल्याचा आरोप संघाचे उपाध्यक्ष प्रदीप उर्फ बंड्या साळवी यांनी केला.
याबाबत उद्योगमंत्र्यांचे बंधू यांच्याशी वाहतूकदारांनी संपर्क केला. त्यानंतर एमआयडीसीच्या अधिकार्‍यांनीही कंपनीच्या अधिकार्‍यांशी चर्चा केली. त्यानंतरही कंपनीच्या अधिकार्‍यांनी भेट टाळल्याने, वाहतूकदार संतप्त झाले होते. अधिकारी येऊन भेटत नाहीत तोपर्यंत कंपनी गेटमध्ाून एक ट्रक आत जाणार नाही असा इशाराच ट्रक मालकांनी दिला.
कंपनीच्या गेट बाहेर ट्रकची मोठी रांग लागली होती.