रत्नागिरी:- उद्योगमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या प्राणीसंग्रहालयाच्या प्रकल्पाला गती मिळाली आहे. तालुक्यातील मालगुंड येथे होणाऱ्या सुमारे ७५ कोटीच्या या प्रकल्पाला केंद्र शासनाच्या झू ॲथॉरिटी समितीने तत्वतः मान्यता दिली आहे. यामधील किरकोळ त्रुटी दूर केल्यानंतर प्राणीसंग्रहालयाच्या प्रकल्पाला अंतिम मंजुरी मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. संग्रहालयासाठी नियुक्त केलेल्या जेमिसन कन्सल्टन्सीचे पदाधिकारी जितेंद्र सिंग यांनी याला दुजोरा दिला.
रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड येथे सुमारे ७५ कोटी रुपये खर्च करून १५ हेक्टर जमिनीवर हे प्राणीसंग्रहालय उभारण्यात येणार आहे. मंत्री उदय सामंत या प्रकल्पासाठी आग्रही आहेत. या प्रकल्पामुळे मोठ्या प्रमाणात तालुक्यात पर्यटनवाढीला मदत होणार आहे. त्यासाठी त्यांच्याकडून वारंवार त्याचा पाठपुरावा सुरू आहे. या प्राणीसंग्रहालय उभारणीसाठी जी कन्सल्टन्सी कंपनी आहे. त्या जेमिसन कन्सल्टन्सीचे जितेंद्र सिंग यांनी याला दुजोरा दिला. प्राणीसंग्रहालयाच्या प्रस्तावाला झू अॅथॉरिटीने तत्वतः मान्यता दिल्याने उभारणीतील मोठी अडचण दूर झाली आहे. आता पर्यावरण विभागाकडून मान्यता मिळाल्यानंतर हा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठवण्यात येणार आहे. या प्राणीसंग्रहालयात ८० प्रकारचे प्राणी असतील. यामध्ये भारतातला टायगर, बिबटे, उदमांजर, गरूड, हरणे, विविध प्रकारचे साप, वानर, फ्लेमिंगो, दुर्मिळ पोपट, परदेशातील मासे, पाणघोडा यांचा समावेश असेल. तारांगणाच्या उभारणीनंतर आता प्राणीसंग्रहालयाचे काम पूर्ण झाल्यानंतर रत्नागिरी शहराला पर्यटनदृष्ट्या महत्व प्राप्त होणार आहे.
यापूर्वी आरेवारे परिसरामधील जागा निश्चित करण्यात आली होती; परंतु सीआरझेडसह पर्यावरण विभागाच्या अनेक अडथळ्यांमुळे प्रकल्पाची ती जागा रद्द करण्यात आली. त्यानंतर पुन्हा वनविभागासह संबंधित विभागाने अनेक ठिकाणाच्या जागांची पाहणी केली. तेव्हा मालगुंड येथील १५ हेक्टर जागा निश्चित करण्यात आली. केंद्र शासनाने प्राणी संग्रहालय उभारण्याच्यादृष्टीने पहिला हिरवा कंदीला दाखवला आहे.