मालगुंड, निवेंडी, चाफे, कळझोंडीत वणव्याचा आगडोंब

कोट्यवधींचे नुकसान; आंबा-काजूच्या बागा जळून खाक 

रत्नागिरी:- तालुक्यातील मालगुड, निवेंडी, चाफे, कळझोंडी या परिसरात वणव्याचा आगडोंब उसळला. आज सकाळी अचानक लागलेला वणवा हा…हा म्हणता सर्वत्र पसरला. वणव्यात पाच आंबा, काजूच्या बागा खाक झाल्या. पाच तासाच्या वणव्यात आंब्यांची 610 तर  काजू सुमारे 280 कलमे खाक झाली आहेत. बागायदार, स्थानिकांच्या शर्थिच्या प्रयत्नानंतर दुपारी तीन वाजता वणवा विझवण्यात यश आले. आगीच्या तांडवात कलमे, विद्युत पंप, वायरी, पाईप आदीचे लाखोंचे नुकसान झाले आहे. 

तालुक्यातील चाफे, निवेंडी-धनगरवाडी, कळझोंडी या परिसरात सकाळी अचानक वणवा लागला. सकाळी दहा वाजता लागेल्या या वणव्याला वार्‍यामुळे आगीचा डोंब उसळत गेला. सुक्या गवातामुळे काही क्षणात वणव्याने आंबा, काजू कलमांच्या बागा घेरल्या. बागायतदार आणि स्थानिकांनी आग आटोक्यात आणण्याचा आटोकाट प्रयत्न केला. मात्र वणवा पसरत नियंत्रणाच्या बाहेर गेला. आगीमध्ये आंबा-काजू कलमे होरपळताना शेतकर्‍यांच्या डोळ्यात पाणी आले. सुमारे पाच तास हे आगीचे तांडव सुरू होते. अखेर 3वाजण्याच्या सुमारास आगीवर नियंत्रण मिळविण्यात सर्वांना यश आले. ऐन आंबा ,काजू हंगामाआधी बागायतदारांवर मोठे संकट कोसळले आहे. यामध्ये भूपेंद्र महदेव भोजे यांची 150 आंबा कलमे 100 काजू, पंप, पाईप, वायरिंग जाळून खाक झाले. बाबाजी रामचंद्र कोकरे यांची 70 कलमे, 80 काजू, भगवान मांब्या कोकरे यांची 89 कलमे 100 काजू, भालचंद्र भिकाजी नलावडे यांची 300 कलमे आणि पंप, वायरिंग तर लक्ष्मण येडगे यांचा पंप आणि वायरिंग जळून खाक झाले आहे. मालगुंड पोलिस ठाण्यात जळीताची नोंद करण्याचे काम उशिरा सुरू होते.