मालगुंड गावात दहावीत पहिला आलेल्या विद्यार्थ्याला मिळाला ध्वजारोहणाचा मान

बारावीत प्रथम आलेल्या श्रुती दुर्गवळी, वैष्णवी सावंत यांनाही ध्वजारोहणाचा मान

रत्नागिरी:- स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव नुकताच मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. मात्र मालगुंड गावातील स्वातंत्र्य दिनाचा सोहळा वेगळ्याच कारणाने चर्चेत आला. ग्रामपंचायतीमध्ये करण्यात आलेले ध्वजारोहण दहावीत शाळेत पहिला आलेल्या शुभ समीर चव्हाण तसेच बारावी कला व वाणिज्य शाखेत प्रथम आलेल्या अनुक्रमे श्रुती दुर्गवळी व वैष्णवी सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. ध्वजारोहणाचा हा सोहळा पाहण्यासाठी ग्रामस्थानी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती. 

 75 वा स्वातंत्र्य दिन सोमवारी मोठ्या उत्साहात आणि आनंदात पार पडला. 75 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त गावागावात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. मालगुंड गावातही विविध कार्यक्रम घेण्यात आले. मात्र या गावातील ध्वजरोहणाचा सोहळा विशेष चर्चेत आला. ध्वजारोहण हे नेहमी गावचे सरपंच किंवा अन्य राजकीय व्यक्तीकडून करण्याची प्रथा खंडित करत हा मान दहावी व बारावी कला व वाणिज्य शाखेत प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांना देण्यात आला.

 याबाबतचे नियोजन मालगुंड ग्रामपंचायतीने केले. सोमवारी सकाळी शुभ चव्हाण, श्रुती दुर्गवळी व वैष्णवी सावंत यांच्या हस्ते भारताचा ध्वज फडकवण्यात आला. हा सोहळा पाहण्यासाठी ग्रामस्थांनी गर्दी केली होती. कु. शुभ समीर चव्हाण वरवडे गावचा विद्यार्थी असून तो मालगुंड येथील बळीराम परकर विद्यालयात शिकत होता. दहावीच्या परीक्षेत 83 टक्के गुण मिळवून संपूर्ण शाळेत प्रथम क्रमांक पटकावला. तर श्रुती संजय दुर्गवळी 12 वी कला शाखेत व वैष्णवी किरण सावंत 12 वी वाणिज्य शाखेत प्रथम आल्या आहेत. त्यामुळे मालगुंड ग्रामपंचायतने आगळा वेगळा निर्णय घेऊन सर्व विद्यार्थ्यासमोर एक उत्तम आदर्श ठेवला.

मालगुंड ग्रामपंचायतीचे सरपंच दिपक दुर्गवळी व ग्रामविकास अधिकारी नाथा पाटील यांच्या या निर्णयाचे पंचक्रोशीतून कौतुक केले जात आहे. मालगुंड ग्रामपंचायतीच्या या निर्णयाचे वरवडे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच निखिल बोरकर यांनी कौतुक केले आहे. प्रत्येक ग्रामपंचायतीने आदर्श घ्यावा असा हा निर्णय असल्याचे बोरकर म्हणाले.