रत्नागिरी:- कोरोना चाचणीत बाधित आलेल्यांना दुरध्वनीद्वारे माहिती दिली जाते; परंतु निगेटीव्ह असलेल्या महिलेला पॉझिटीव्ह असल्याचा संदेश मिळाल्यामुळे कोणत्या मानसिक त्रासाला सामोरे जावे लागते याचा अनुभव रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड येथील एका कुटूंबियाने घेतला. याबाबत संबंधित महिलेच्या नातेवाईकांनी जिल्हा परिषद आरोग्य विभागाकडे तक्रार दिली आहे.
कोरोना बाधित वाढत असल्याने मालगुंड गाव कोरोना प्रतिबंधीत क्षेत्र जाहीर केले आहे. आरोग्य यंत्रणेने सरसकट चाचण्या सुरु केल्या आहेत. मालगुंड येथे राहणार्या एका 65 वर्षीय प्रौढ महिलेचे अॅण्टीजेन आणि आरटीपीसीआर चाचण्यांसाठी स्वॅब घेण्यात आले. अॅण्टीजेनचा अहवाल निगेटीव्ह आला. आरटीपीसीआरचा अहवाल दोन दिवसात मिळेल, असे आरोग्य यंत्रणेकडून सांगण्यात आले. दुसर्याच दिवशी त्या महिलेला जिल्हा परिषद आरोग्य विभागातून एका कर्मचार्याचा फोन आला की तुमची घश्याची (आरटीपीसीआर) चाचणी पॉझिटीव्ह आली आहे. तेव्हा तुम्ही गणपतीपुळे भक्त निवास कोविड सेंटरला दाखल व्हा. कोरोना बाधित असल्याचे ऐकल्यावर त्या महिला घाबरल्या. त्यांनी ही बाब रत्नागिरीतील मुलीला सांगितली. त्यानंतर सुत्र हलली. गावातील लोकांच्या सुचनेनंतर मालगुंड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात चौकशी केली. तेथून सिव्हीलला चौकशीची सुचना दिली. सिव्हिलमध्ये समजले की मालगुंड येथील कोणाचाच अहवाल दिलेला नाही. मालगुंड येथील स्वॅब टेस्टिंग रात्री होणार असून अहवाल दुसर्या दिवशी सकाळी 10 वाजता मिळतील. या प्रकारामुळे त्या ज्येष्ठ नागरिक महिलेसह नातेवाईकांना मानसिक त्रासाला सामोरे जावे लागले. त्याच रात्री 12 वाजता आलेल्या मेसेजमध्ये अहवाल निगेटीव्ह असल्याचे समजले. त्यानंतर सर्वांनीच सुटकेचा निःश्वास टाकला; परंतु आरोग्य यंत्रणेचा भोंगळ कारभार निश्चितच नागरिकांसाठी त्रासदायक ठरत आहे. याबाबत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुध्द आठल्ये यांच्याकडे लेखी तक्रारही देण्यात आली आहे.