रत्नागिरी:- स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका त्यांची मुदत संपण्यापूर्वी घेण्याचे आयोगावर संविधानिक बंधन आहे, असे स्पष्ट करत, राज्य निवडणूक आयोगाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्यामुळे मार्चमध्येच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्याचे संकेत आयोगाने 17 जानेवारी रोजी काढलेल्या पत्रातून दिले आहेत.
सन 2022 मध्ये राज्यातील जिल्हा परिषदा, नगरपालिका, महानगरपालिकांच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत. रत्नागिरीसह काही नगर परिषदेच्या मुदत संपल्याने तिथे प्रशासकराज सुरू आहे. साथरोग कायदा व आपत्ती व्यवस्थापन कायद्यान्वये शासनाने दिलेले आदेश व सूचनांचे पालन करणे अत्यंत आवश्यक आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने 2022 मधील निवडणुकांसाठी सधारित मार्गदर्शक सूचना जारी केल्या असून, त्याआधारे राज्य आयोगानेही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी परिस्थितीनुरूप मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. निवडणूक प्रक्रियेशी संबंधित अधिकारी, कर्मचारी मतदार, राजकीय पक्ष, उमेदवार व त्यांचे प्रतिनिधी, प्रसारमाध्यमे आदींसह सर्व संबंधितांवर या सूचनांचे पालन करण्याची जबाबदारी असल्याचे आयोगाने पत्रात म्हटले आहे.
मास्क, फेस मास्क वापरणे. सामाजिक अंतर ठेवणे, लसीचे दोन्ही डोस घेतलेले असावे. सॅनिटायझरचा वापर करणे. अधिकारी, कर्मचार्यांंना मोठ्या सभागृहात विकेंद्रित पद्धतीने प्रशिक्षण देणे. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी ऑनलाइन पद्धत वापरणे. या सूचना पत्रात आयोगाने नामनिर्देशन प्रक्रिया, मतदान केंद्रावरील व्यवस्था, स्ट्राँग रूमची व्यवस्था, मतमोजणी, प्रतिबंधात्मक क्षेत्र, राजकीय पक्ष व इच्छुक उमेदवारांच्या रोड शो, जाहीर सभा आदी प्रचारासाठीचे निकष व बंधने स्पष्ट केली आहेत.
बहुसदस्यीय प्रभाग असल्यास 700 ते 800 मतदार एका मतदान केंद्रावर जोडावेत. एक सदस्यीय प्रभाग असल्यास 1 हजार ते 1200 मतदार जोडावेत, अशा सूचनाही आयोगाने अधिकार्यांना दिल्या आहेत. मतदानासाठी आलेल्यांची गर्दी टाळण्यासाठी टोकन सिस्टीम राबविण्यात येणार आहे. मतदान केंद्रात जाण्याआधी व बाहेर येताना सॅनिटायझरची व्यवस्था असावी. फेसमास्क नसलेल्या मतदारांना देण्यासाठी अतिरिक्त फेसमास्क उपलब्ध असावेत. तसेच कोविड बाधित मतदारांना मतदानाची वेळ संपण्याच्या शेवटच्या एक तासात मतदान करता येईल.
जिल्ह्यात 61 गट व 124 गण होण्याची शक्यता…
येणार्या निवडणुकीच्या आधी गट व गणांची पुनर्रचना करण्यात येणार असल्याचे यापूर्वीच निवडणूक विभागाने स्पष्ट केले आहे. मात्र, याबाबत अजून कोणतीच हालचाल सुरू झालेली नाही. मतदान संख्येनुसार गटाची रचना होणार आहे. जिल्ह्यात साधारण 5 ते 6 गट वाढू शकतात, असे जाणकारांचे मत आहे. सध्या 55 गट व 110 गण आहेत. ही संख्या 61 गट व 124 गण अशी होण्याची शक्यता आहे.









