मार्गशीर्ष महिन्यात चिकनच्या मागणीत तब्बल पंचवीस टक्क्यांनी घट

रत्नागिरी:- गेल्या काही दिवसांपासून चिकनच्या मागणीत मोठी घट झाली आहे. मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचे उपवास आणि संपूर्ण महिना मांसाहार न करणार्‍या लोकांची संख्या जास्त असल्यामुळे तसेच यंदाच्या हिवाळ्यात अपेक्षित थंडी न पडल्याचा परिणाम म्हणून चिकनच्या मागणीत पंचवीस टक्क्यांनी घट झाली आहे. मार्गशीर्ष महिना संपल्यानंतर मागणी वाढून दरातही तेजी येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचे उपवास आणि संपूर्ण महिन्यात मांसाहार न करणार्‍यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे चिकन आणि अंड्याच्या मागणीत घट झाली आहे. चिकनची मागणी पंचवीस टक्क्यांनी घटली आहे, तर अंड्याच्या मागणीत चढ-उतार सुरू आहे. 23 डिसेंबरनंतर म्हणजे मार्गशीर्ष महिना संपल्यानंतर चिकनच्या मागणीत अचानक वाढ होईल, परिणामी दरातही काहीशी तेजी येण्याची शक्यता आहे.
दरवर्षी हिवाळ्यात अंडी आणि चिकनची मागणी वाढते. यंदा हिवाळ्यात अपेक्षित थंडी अद्याप पडलेली नाही. थंडी वाढल्यास चिकन, अंड्याच्या मागणीत वाढ होईल. अद्याप थंडी पडलेली नाही. चिकनची मागणी कमी झाल्यामुळे कुक्कुटपालक सावधगिरीने पावले उचलत आहेत. त्यात मक्याचे दर बावीस रुपयांवर गेल्यामुळे खाद्याचे दरही चढचे आहेत.

येत्या मार्चमध्ये मक्याचे चांगले उत्पादन होईल, त्यानंतर खाद्याचे दर खाली येतील, असे मानले जात  आहे. सर्वसाधारणपणे उन्हाळ्यात चिकन, अंड्याची मागणी आणि दरही कमी होतात. त्यामुळे खाद्याच्या दरात झालेल्या घटीचा फारसा फायदा कुक्कुटपालकांना होत नाही.