देवरुख:- संगमेश्वर तालुक्यातील पांगरी कड्याचा पऱ्या येथे मारुती स्वीफ्ट डिझायर गटारात पलटी होऊन झालेल्या अपघातात एक वृद्ध ठार झाल्याची माहिती गुरुवार दिनांक १७ फेब्रुवारी रोजी देवरुख पोलिसांनी दिली आहे.
याबाबत देवरुख पोलीस स्थानकातून मिळालेल्या माहिती नुसार अपघाताची खबर कुणाल किरण कुंभार यांनी दिली आहे. मारुती स्विफ्ट डिझायर (क्रमांक एम एच- १२, एफ वाय ५८४४) पाटगाव येथून रत्नागिरीच्या दिशेने जात असताना चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने पांगरी नजीकच्या कड्याच्या पऱ्या येथे एका वळणात गटारात पलटी झाल्याची घटना बुधवारी रात्री ११ वाजता घडली. कुणाल याचा साखरपुडा असल्याने घरची व मित्र मंडळी पाटगाव येथे आली होती. घरच्या दिशेने परतत असताना देवरुख रत्नागिरी मार्गावरील पांगरी येथे हा अपघात घडला.
अपघातात गोपीनाथ कुंभार, कुणाल कुंभार, रुपेश पावसकर, किरण कुंभार, कविता कुंभार हे जखमी झाले. गोपीनाथ गोपाळ कुंभार (वय६४ वर्षे) याना गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे. अन्य जखमींना रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार करून घरी सोडण्यात आले आहे. अपघाताची माहिती मिळताच देवरुख पोलीस स्थानकाच्या उपनिरीक्षक विद्या पाटील, पोलीस नाईक जे एस तडवी, संदीप जाधव, किशोर जोयशी यांनी घटनास्तली जाऊन पाहणी व पंचनामा केला.
गोपीनाथ कुंभार यांच्या अपघाती निधनामुळे फणसोप गावावर शोककळा पसरली आहे.अधिक तपास उपनिरीक्षक विद्या पाटील करत आहेत.