मारुती मंदिर येथील शिवसृष्टीतील पुतळ्यांची तोडफोड; एकजण ताब्यात

रत्नागिरी:- रत्नागिरी शहराच्या मध्यवत ठिकाणी मारूतीमंदिर सर्कलमधील शिवसृष्टीतील मावळ्यांच्या पुतळ्यांची रविवारी मध्यरात्री एका मद्यधुंद तरूणाने विटंबना केल्याने शहरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी संदेश गावडे (वय 24, रा.रत्नागिरी) याला अटक केली आहे. तर कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये  अथवा अफवांचे बळी पडू नका असे आवाहन पोलीस अधिक्षक धनंजय कुलकण यांनी नागरिकांना केले आहे.

रविवारी मध्यरात्री 1.30 वाजण्याच्या सुमारास एक मद्यधुंद तरूण शिवसृष्टीमधील पुतळ्यांची विटंबना करत असल्याचे एका तरूणाने पाहिले त्यावेळी त्या तरूणाने त्याला अटकाव करण्याचा प्रयत्न केला. परंतु संदेश गावडे याने एका पुतळ्याच्या पुढ्यातील भाला काढून त्याच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर संबंधित तरूणाने या घटनेची माहिती शहर पोलिसांना दिली. काही क्षणातच शहर पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
एका तरूणाने हटकल्यानंतर संदेश गावडे हा मारूतीमंदिर येथून एसटी स्टँडकडे पळून गेला होता. पोलिसांनी तात्काळ त्याचा शोध सुरू केला. त्यावेळी संदेश गावडे हा आठवडा बाजार येथे पोलिसांना आढळून आला. त्याने घातलेल्या टी-शर्टवरून संबंधित तरूणाने संदेश गावडे याला ओळखले. त्यानंतर पोलिसांनी संदेश गावडे याच्यावर सार्वजनिक संपत्तीस हानी प्रतिबंधक अधिनियम 1984 चे कलम 3(1) अन्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.
या घटनेचे वृत्त समजताच सोमवारी सकाळी काही नागरिक, विविध पक्षांचे पदाधिकारी पोलीस स्थानकात दाखल झाले होते. संबंधित तरूणावर कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे तर पोलिसांनीही नागरिकांना आवाहन करताना कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे म्हटले आहे.