मान्सूनमध्ये निर्धोक प्रवासासाठी कोकण रेल्वे सज्ज

रत्नागिरी:- गेल्या नऊ वर्षात कोकण रेल्वे मार्गावर केलेल्या कामांमुळे दरड कोसळून वाहतूक ठप्प झाल्याच्या मोठ्या घटना घडलेल्या नाहीत. यंदाही सुरक्षेविषयक कामे पूर्ण केली असून पावसाळ्यात चोविस तास गस्तीसाठी 846 जणांची नियुक्ती केली आहे. मॉन्सूनला सामोरे जाण्यासाठी कोकण रेल्वे सज्ज झाली असून 10 जूनपासून गाड्या पावसाळी वेळापत्रकानुसार धावणार आहेत.

कोकणात पडणार्‍या मुसळधार पावसामुळे अनुचित प्रकार घडू नये यासाठी कोकण रेल्वेने 740 किलोमीटर मार्गावर नियोजित सुरक्षा कामे पूर्ण केली आहेत. गटारांची साफसफाई, रुळांची तपासणी याकडे विशेष लक्ष देण्यात आले होते. गेल्या काही वर्षांमध्ये रेल्वे मार्गावर मोठ्या प्रमाणात भू-सुरक्षा कार्ये राबविल्यामुळे दगड पडण्याच्या आणि माती घसरण्याच्या घटनांमध्ये लक्षणीय घट झाली आहे. त्यामुळे गाड्या सुरक्षितपणे चालवल्या गेल्या. गेल्या नऊ वर्षांत पावसाळ्यात रेल्वे सेवेत कोणताही मोठा व्यत्यय आलेला नाही.

गाड्या सुरक्षितपणे चालवता याव्यात यासाठी कोकण रेल्वे मार्गावर मान्सून पेट्रोलिंग केले जाणार असून त्यासाठी 846 जणांची नियुक्ती केली आहे. असुरक्षित ठिकाणी चोवीस तास गस्त घालण्यात येणार असून तेथे वॉचमन तैनात केले जातील. त्या ठिकाणी वेगावर निर्बंध आणले गेले आहेत. आपत्कालीन परिस्थितीत जलद हालचाल करण्यासाठी आवश्यक ती यंत्रणा सज्ज ठेवली आहे. दृश्यमानता मर्यादित असताना अतिवृष्टीच्या बाबतीत लोको पायलटना ताशी 40 किलोमीटरच्या कमी वेगाने गाड्या चालवण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. रत्नागिरी आणि वेर्णा येथे ऑपरेशन थिएटर आणि आपत्कालीन वैद्यकीय मदतीची तरतूद असलेली सेल्फ-प्रोपेल्ड एआरएमव्ही (अपघात निवारण वैद्यकीय व्हॅन) तर वेर्णा येथे एआरटी (अ‍ॅक्सिडेंट रिलीफ ट्रेन) देखील सज्ज ठेवली आहे.

आपत्कालीन परिस्थितीत नियंत्रण कक्षाशी संपर्क साधण्यासाठी मोबाईल फोन तर लोको पायलट आणि गार्ड्सना वॉकी-टॉकी दिले आहेत. कोकण रेल्वेवरील प्रत्येक स्थानकावर 25 वॅटचे व्हीएचएफ स्टेशन असन रेल्वेतील कर्मचारी आणि स्टेशन मास्टर यांच्यात वायरलेस संपर्क होऊ शकतो. इमर्जन्सी कम्युनिकेशन सॉकेट्स सरासरी 1 किमी अंतरावर आहेत. त्याचा उपयोग गस्तीवर, वॉचमन, लोको पायलट, गार्ड आणि इतर फील्ड देखभाल कर्मचार्‍यांना होईल. सिग्नल दृश्यमानता सुधारण्यासाठी कोकण रेल्वेवरील सर्व मुख्य सिग्नल एलईडीत रुपांतरीत केले आहेत. माणगाव, चिपळूण, रत्नागिरी, विलवडे, कणकवली, मडगाव, कारवार, भटकळ आणि उडुपी या नऊ स्थानकांवर सेल्फ रेकॉर्डिंग पर्जन्यमापक बसवले आहे. काली नदी (माणगाव आणि वीर दरम्यान), सावित्री नदी (वीर आणि सापे वामणे), वाशिष्ठी नदी (चिपळूण आणि कामठे) येथे पूर चेतावणी प्रणाली बसवली आहे. धोक्याच्या पातळीवर पाण्याचा प्रवाह आल्यास अलार्मद्वारे ती सतर्क करते. तसेच बेलापूर, रत्नागिरी आणि मडगाव येथे नियंत्रण कक्ष सुरु केले आहेत.