मान्सूनपूर्व पावसाचा दणका; मालगुंडमध्ये घरावर वीज कोसळली

रत्नागिरी:- केरळमध्ये मान्सून दाखल झाला असला तरीही रत्नागिरी जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाच्या सरी सुरु आहेत. वीजांचे तांडव सुरु असून ठिकठिकाणी वीज पडून नुकसान होत आहे. मालगुंड (ता. रत्नागिरी) येथे घरावर वीज पडून स्वयंपाक खोलीचे मोठे नुकसान झाले. जेवणाची वेळ असतानाही घरातील सर्वजणं बाहेर गप्पात रंगल्यामुळे मोठा अनर्थ टळला आणि कुणालाही दुखापत झाली नाही.

मागील चोविस तासात जिल्ह्यात सरासरी 24.41 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. त्यात दापोली 30.90, खेड 48.90, गुहागर 45.80, चिपळूण 52.40, संगमेश्वर 17.20, रत्नागिरी 12.70, राजापूर 3.70, लांजा 8.10 पाऊस झाला. गेले चार दिवस जिल्ह्यात ढगांच्या गडगडाटासह विजांचे तांडव सुरु आहे. चिपळूण, संगमेश्‍वरसह अनेक ठिकाणी वीज पडून नुकसान झाले. काही नागरिकही बाधित झाले. जिल्ह्याला मान्सूनची प्रतिक्षा असून संगमेश्‍वरमध्ये गुरुवारी (ता. 3) सायंकाळी जोरदार पावसाच्या सरी पडल्या. रत्नागिरी सायंकाळपर्यंत ढगाळ वातावरण होते.

रत्नागिरी तालुक्यात बुधवारी (ता. 2) हलका पाऊस आणि विजांचे तांडव सुरु होते. रात्री दहा वाजण्याच्या सुमारास मालगुंड येथील सरपंच दिपक दुर्गवळे यांच्या घरावर वीज पडली. अचानक वीजेचा आवाज झाल्यामुळे दिपक किचनकडे धावले. घरातील वीज पुरवठाही खंडित झाला होता. आतमध्ये धुराचा लोट होते. बॅटर्‍या सावरत त्यांनी घरातील वीज मीटर बंद केला. हा प्रकार घडला तेव्हा दुर्गवळे पत्नी आणि लहान मुलीसह बाहेरच्या पडवीत बसले होते. तर त्यांची आई, मोठी मुलगी आणि भाऊ हॉलमध्ये होते. वडील घरातील एका खोलीत झोपले होते. गप्पा रंगल्यामुळे जेवणाची वेळ टळली होती. त्याचवेळी स्वयंपाक खोलीवर वीज पडली. सुदैवाने कोणालाही दुखापत झालेली नाही. यामध्ये घरातील संपूर्ण वायरींग जळून गेले आणि फ्रिजचे नुकसान झाले. स्वयंपाक खोलीतील ओट्याचा काही भाग फुटला. छताच्या पत्र्या कोसळलेली वीज लादीवर आपटून किचनचा ओटा फोडून जवळच असलेल्या बाथरुमचा सिमेंटचा दरवाजा उभा पिंजत खिडकीवाटे बाहेर गेली असावी असा अंदाज दिपक यांनी व्यक्त केला. विजेच्या तांडवाने अस्वाव्यस्त किचन पाहील्यावर दुर्गवळे कुटूंबियांच्या काळजाचा ठोका चुकला होता. ओट्याच्या बाजूला असलेल्या गॅस सिंलींडरपर्यंत विजेचा लोळ पोचला नव्हता. झालेल्या नुकसानीचा पंचनामा केला असून सुमारे 70 हजाराचे नुकसान नोंदले गेले आहे.

दरम्यान, पावसामुळे गुहागर तालुक्यातील धनगरवाडी येथे संरक्षक भिंत पडून तिघांना दुखापत झाली. तर दापोली तालुक्यातील दाभोळ येथे घराशेजारी दरड कोसळली. यामध्ये ज्योती जितेंद्र पालशेतकर या किरकोळ जखमी झाल्या आहेत. त्यांच्यावर उपचार करुन घरी सोडण्यात आल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.