रत्नागिरी:- कर्नाटक, गोव्यापर्यंत रखडलेला मॉन्सून अखेर तळकोकणातून रत्नागिरीकडे सरकला. जिल्ह्यात दुपारनंतर मुसळधार पावसाला आरंभ झाला. नैर्ऋत्य मोसमी पावसाचे आगमन झाल्याचे हवामान विभागाकडून जाहीर करण्यात आले. त्यामुळे बळीराजाला दिलासा मिळाला आहे.
मोसमी पावसाने यंदा सर्वसाधारण वेळेच्या दोन दिवस आधीच म्हणजे 29 मे रोजी केरळमधून भारतात प्रवेश केला होता. अरबी समुद्राच्या बाजूने मोसमी पावसाचा प्रवास गेल्या नऊ ते दहा दिवसांपासून थांबलेला होता. अखेर मान्सूनचा प्रवेश दक्षिण कोकणातून महाराष्ट्रात झाला. भारतीय हवामान विभागाने शुक्रवारी (ता. 10) त्याचा प्रवेश झाल्याचे जाहीर केला. गोव्याची हद्द ओलांडून मोसमी पाऊस दक्षिण कोकणातील वेंगुर्ल्यापर्यंत दाखल झाला. हा प्रवास पुढे रखडेल अशी शक्यता होती; मात्र सायंकाळपासून जोरदार पावसाला आरंभ झाला आहे. वार्याच्या वेगामुळे पाऊस वेगाने पुढे सरकु लागला आहे. समुद्रातून येणार्या बाष्पामुळे महाराष्ट्रात कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रासह इतर भागांतही पावसाला सुरुवात झाली आहे. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार आहे. पुढील प्रगतीसाठी अनुकूल स्थिती असल्याचे हवामान विभागाकडून जाहीर करण्यात आले. मोसमी पाऊस लवकर दाखल होण्याची शक्यता असल्यामुळे जिल्ह्यातील शेतकर्यांनी 1 जुनपासूनच पेरण्यांना आरंभ केला. पुढे पावसाचा पत्ताच नव्हता. परिणामी पेरलेले भात रुजून कसे येणार याची चिंता होती. सुमारे पाच दिवस पाऊसच नव्हता. त्यानंतर हलका पाऊस झाला पण तोही जास्त काळ नव्हता. अशी स्थिती असतानाच शुक्रवारी (ता. 10) दुपारपासून ढगाळ वातावरण तयार झाले होते. सायंकाळी वेगवान वार्यासह जोरदार पावसाला सुरवात झाली. सुमारे एक तासाहून अधिक काळ जोर होता. जिल्ह्यात सगळीकडेच पावसाने हजेरी लावल्यामुळे बळीराजाला दिलासा मिळाला आहे. हवामान विभागाने पुढील चार दिवस मुसळधार पावसाची शक्यता वर्तविली आहे.