रत्नागिरी: राज्यातल्या ग्रामपंचायत इमारतीच्या कामांसाठी निधी वाढविण्याचा तसेच बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत योजनेलाही मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता ही योजना २०२७-२८ या वर्षापर्यंत राबविण्यात येणार आहे. यामध्ये निधीचीही वाढ करण्यात आली आहे.
स्वतंत्र इमारत नसलेल्या २ हजार पेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतींना १५ लाख ऐवजी २० लाख रुपये व २ हजार पेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतींना १८ लाख ऐवजी २५ लाख अनुदान देण्यास मान्यता देण्यात आली. तसेच ग्रामपंचायत स्वनिधीची असलेली अट देखील रद्द करण्यात आली आहे. ग्रामपंचायत बांधकामासाठी यापेक्षा अधिक निधीची आवश्यकता अतिरिक्त निधी केंद्र व राज्य शासनाच्या इतर योजना, वित्त आयोग निधी, जिल्हा ग्रामविकास निधी, स्थानिक विकास निधी (खासदार, आमदार निधी) इ. बाबींमधून देण्यात येईल.
राज्यातील ज्या ग्रामपंचायतींना स्वत:चे कार्यालय नाही, अशा ४२५२ ग्रामपंचायतींना स्वत:चे कार्यालय बांधण्यासाठी मा. बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेस २०१८- १९ ते २०२१- २२ या ४ वर्षांसाठी मान्यता देण्यात आली होती. त्यानुसार १७४८ ग्रामपंचायतींना स्वत:चे कार्यालय बांधण्यासाठी प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती. या ग्रामपंचायत इमारतींचे बांधकाम सुरू असून, याकरिता आतापर्यंत ३८१३.५० लाख रुपये इतका निधी खर्च करण्यात आला आहे, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली.









