रत्नागिरी:- कोरोनावर नियंत्रण ठेवण्यासाठी शासनाने ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहीम गावपातळीवर राबविण्यास सुरवात केली आहे. या मोहिमेची सुरवात 15 सप्टेंबर झाली असून आतापर्यंत किती घरात आरोग्य पथके पोचली याची आकडेवारी जिल्हा परिषद आरोग्य विभागाकडून सांगण्यास टाळाटाळ होत आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या ऑनलाईन आढावा बैठकीत 32 टक्के घरांचे सर्व्हेक्षण झाल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले होते; मात्र सविस्तर आकडेवारी देण्यास आरोग्य विभाग तयार नसल्याने संभ्रम निर्माण झाला आहे.
कोरोनाचा कहर राज्यभर सुरु असल्यामुळे त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वाकांक्षी मोहिम हाती घेतली आहे. कोरोना बाधित रुग्णांसह अनेक व्याधी रुग्णांवर वेळेत उपचार होत नसल्यामुळे माझे कुटूंब माझी जबाबदारी योजनेंतर्गत प्रत्येक घरात आरोग्य पथक जाऊन नागरिकांची तपासणी करणार आहे. या मोहिमेचे सर्वच स्तरातून स्वागत होत आहे. शहर, गाव, वस्त्या, तांडे यातील प्रत्येक नागरीकांची आरोग्य तपासणी, अतितिव्र स्वरुपाचे आजार असल्यास त्यांना उपचार देणे, प्रत्येक नागरिकास व्यक्तीशः भेटून आरोग्य शिक्षण देणे याचा अवलंब करण्यास सुरवात झाली आहे. गावात कुणी विरोध केल्यास स्थानिक लोकप्रतिनिधींनी आरोग्य पथकाला सहकार्य करावयाचे आहे. 15 सप्टेंबरपासून सुरू झालेल्या मोहीमेत गाव पातळीवर आरोग्य जात आहेत. याबाबत ग्रामस्थांकडून सहकार्य होत असून या मोहिमेच स्वागत केले जात आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात 4 लाख 27 हजार 773 कुटूंबे असून लोकसंख्या 14 लाख 22 हजार आहे. पाच शहरांमध्ये कुटूंब संख्या 54 हजार 26 इतकी आहे. त्यासाठी सुमारे पावणेसातशे पथके कार्यरत आहेत. ही पथके घरोघरी जाऊन तपासणी करत आहेत, माहितीही देत आहेत. किती कुटूंबांची तपासणी झाली याबाबत जिल्हा परिषद आरोग्य विभागाकडे चौकशी केल्यानंतर एकत्रित माहिती उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले. मुख्यमंत्र्यांना दिलेल्या आढाव्यात 32 टक्के कुटुंबांची तपासणी झाली असे सांगितले गेले. जिल्हा परिषद आरोग्य विभाग मुख्यमंत्र्यांपुढे आकडेवारी देत असेल तर ती जाहीर केली जात नसल्याचे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. आरोग्य विभागाकडून आकडेवारी सादर न करण्याचे कोडे न उलगडणारे आहे. त्यामुळे प्रत्यक्षात कार्यवाही चांगली होत असली तरीही आकडेवारी जाहीर न केल्यामुळे गोंधळाचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे.