रत्नागिरी:- ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेंतर्गत घरोघरी तपासणीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. आतापर्यंत 32 टक्के लोकांची तपासणी झाली असल्याची माहिती जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे झालेल्या आढावा बैठकीत दिले.
ही मोहीम कोकण विभागात गावपातळीपर्यंत राबविण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे. कोरोनाच्या समूळ उच्चाटनासाठी याचा निश्चितच उपयोग होईल. कोरोना रोखण्यासाठी प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचणे अत्यावश्यक आहे. मास्क वापरणे, हात स्वच्छ धुणे, सोशल डिस्टन्सिंग ठेवणे या त्रिसूत्रीची अमंलबजावणी करा, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.
या वेळी मुख्य सचिव संजय कुमार, जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड, जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संघमित्रा फुले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बबिता कमलापूरकर उपस्थित होते.
जिल्ह्यात ही मोहीम प्रभावीपणे राबविण्यात येत असून त्यासाठी 677 टीम कार्यरत आहेत. जिल्ह्यात जवळपास 32 टक्के लोकांची तपासणी झाली आहे. कुटुंबांच्या तपासणीदरम्यान लक्षणे आढळलेल्या नागरिकांसाठी फिवर क्लिनिक सुरू करण्यात आली आहेत. प्रत्येक रुग्णाची अथवा लक्षणे असलेल्या व्यक्तींची पूर्ण तपासणी झाल्याशिवाय घरी जाऊ दिले जात नाही. त्यांना विलगीकरणात ठेवले जात आहे.
प्रसिद्धीसाठी नियोजन
मोहिमेंच्या प्रभावी अंमलबजावणीच्या अनुषंगाने व्यापक प्रसिद्धीसाठी ‘कुटुंबाची साथ कोरोनावर मात’ या घोषवाक्यास अनुसरून शालेय, महाविद्यालयीन आणि खुल्या गटात वक्तृत्व स्पर्धा, गाणी, नाटिका, एकपात्री व्हिडिओ स्पर्धा, पोस्टर्स, रांगोळी स्पर्धा, दीपोत्सव, निबंध स्पर्धा, छायाचित्रण स्पर्धा, प्रश्नमंजुषा स्पर्धा, फेसबुक लाइव्ह, गुढी महोत्सव, उत्कृष्ट व्हिडिओ, फोटोज्ना यू टयूबवर प्रसिद्धी देणे, होर्डिंग लावणे आदी कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे.