रत्नागिरी:- शहरातील विठ्ठल मंदिर परिसरात शिंदे गटाच्या शाखाप्रमुखाला भाजपाच्या माजी नगरसेवकांकडून मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे. याबाबतची तक्रार शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
शहरातील नवीन भाजी मार्केट परिसरात राहणारे शिंदे गटाचे शाखाप्रमुख मिलिंद देवरुखकर व विठ्ठल मंदिर परिसरात राहणारे भाजपाचे माजी नगरसेवक राजेश तोडणकर व त्यांचे बंधू परेश तोडणकर याच्यात काही कारणांनी वाद झाला. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले अन शाखाप्रमुख मिलिंद देवरुखकर यांना माजी नगरसेवक राजु तोडणकर व त्याचे बंधू परेश तोडणकर यांनी मारहाण केली. याची तक्रार मिलींद देवरुखकर यांनी बुधवारी रात्री उशिरा शहर पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. भाजपचे माजी नगरसेवक राजेश कृष्णा तोडणकर व त्याचे भाऊ परेश कृष्णा तोडणकर यांच्या विरोधात शहर पोलीस ठाण्यात शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून भादवि 451, 324, 323, 504, 34 प्रमाणे राजेश तोडणकर व भाऊ परेश तोडणकर याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.









