सुनेच्या तक्रारीनंतर कौटुंबिक हिंसाचार व जादूटोणा प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल
ठाणे:- ठाकरे गटाचे माजी खासदार विनायक राऊत, त्यांचा मुलगा तथा नगरसेवक गितेश राऊत आणि कुटुंबातील इतर सदस्यांविरोधात ठाण्यातील कापूरबावडी पोलिस ठाण्यात कौटुंबिक हिंसाचार तसेच महाराष्ट्र नरबळी व इतर अमानुष, अनिष्ट आणि अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही तक्रार त्यांची सून गिरीजा राऊत यांनी दिली आहे.
गिरीजा राऊत यांनी आपल्या तक्रारीत शारीरिक, मानसिक आणि भावनिक छळ झाल्याचा गंभीर आरोप केला आहे. तसेच कुटुंबीयांसह फिरोज बाबा आणि काजी बाबा यांच्याविरोधातही जादूटोणा प्रतिबंधक कायद्याअंतर्गत कारवाईची मागणी केली असून, त्यानुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणामुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे.
महाराष्ट्रात यापूर्वीही प्रभावशाली व्यक्ती, राजकीय नेते, उद्योगपती आणि उच्चभ्रू कुटुंबांतील कौटुंबिक वाद, सुनेच्या छळाच्या तक्रारी आणि अंधश्रद्धेशी संबंधित आरोप वेळोवेळी समोर आले आहेत. प्रभावशाली कुटुंबांतील अनेक वाद घराच्या चार भिंतीतच दडपले जातात, अशी चर्चाही सातत्याने होत असते.
महाराष्ट्रात अंधश्रद्धा आणि जादूटोण्याच्या नावाखाली होणाऱ्या अमानुष प्रकारांना आळा घालण्यासाठी स्वतंत्र कायदा करण्यात आला आहे. या कायद्याअंतर्गत गुन्हा नोंद होणे ही गंभीर बाब मानली जाते. मात्र, या प्रकरणातील आरोप अद्याप न्यायालयात सिद्ध झालेले नाहीत. पोलिस तपासानंतरच वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे.
दरम्यान, या गुन्ह्यामुळे माजी खासदारांच्या कुटुंबावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, कायद्यापुढे सर्व समान असल्याचा संदेश पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे. या प्रकरणाचा तपास कापूरबावडी पोलीस करत असून, तपासानंतर पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.






