माजी आमदार संजय कदम यांचा शिंदे सेनेत प्रवेश

दापोली:– रत्नागिरी जिल्ह्यात उद्धव ठाकरे यांना पुन्हा एकदा मोठा धक्का बसला आहे. राजापूरचे माजी आमदार राजन साळवी यांच्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख आणि दापोलीचे माजी आमदार संजय कदम यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे. यावेळी शिवसेना नेते रामदास कदम, पालकमंत्री उदय सामंत, गृहराज्यमंत्री योगेश कदम उपस्थितीत होते.

संजय कदम म्हणाले की, आपण १९८९ पासून रामदास कदम यांच्या पहिल्या निवडणुकीपासूनच शिवसेनेचे आहोत, त्यामुळे मी आज घरात आल्यासारखे मला वाटतंय येत्या काळात कोकणात रत्नागिरी जिल्हा परिषदेमध्येही शिवसेनेचा भगवा फडकेल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या काळात कोकणात विकासाला गती मिळाली. आज पुन्हा ते सत्तेत आहेत, त्यामुळे आम्ही रामदास कदम यांच्या मागे उभे राहण्यासाठी पुन्हा शिवसेनेत पक्षप्रवेश केला आहे, असे संजय कदम म्हणाले.

संजय कदम हे एकनाथ शिंदेंच्या संपर्कात असल्याची चर्चा सुरू झाल्यानंतर त्यांची उबाठा शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली होती. मंगळवारी त्यांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा भगवा हाती घेतला. याशिवाय संभाजीनगर जिल्ह्यातील माजी आमदार भाऊसाहेब पाटील -चिकटगावकर, माजी नगराध्यक्ष साबीर भाई खान, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष दिनकर बापू पवार, जिल्हा परिषद सदस्य बादशाह पटेल, पंचायत समितीचे माजी सभापती राजूनाना मगर यांनीही शिवसेनेत प्रवेश केला. सोबतच, मुंबईच्या भांडुप येथील माजी नगरसेवक उमेश पाटील, माजी नगरसेविका अंजली नाईक, लोचना चव्हाण यांनीही शिंदे गटात प्रवेश केला. आगामी निवडणुकीत हे नेते शिंदे गटाच्या विजयात मोलाची भूमिका बजावतील, असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.

बोक्याना मिळालेली ही चपराक : एकनाथ शिंदे

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, कोकण हा बाळासाहेबांच्या विचाराने प्रेरित झालेला शिवसेनेचा बालेकिल्ला असून, प्रथम माजी आमदार राजन साळवी व आज संजय कदम यांच्या घरवापसीमुळे पुन्हा हा बालेकिल्ला मजबूत झाला आहे. ५० खोके एकदम ओके अशा घोषणा देणाऱ्या बोक्याना मिळालेली ही चपराक आहे. विधानसभा निवडणुकीत शिवसेना कुणाची याचे उत्तर जनतेने दिले आहे, त्यामुळेच आज दररोज हजारो कार्यकर्ते मूळ शिवसेनेत प्रवेश करत आहे.