रत्नागिरी:-मागील पंधरा दिवस मुसळधार कोसळणाऱ्या पावसामुळे तालुक्यातील माजगाव बौद्धवाडी येथील पुलाजवळ टाकण्यात आलेला मातीचा भराव वाहून गेला आहे. मोठ्या प्रमाणावर भराव वाहून गेल्याने पूल आणि पुलाला जोडणारा साकव यांना धोका निर्माण झाला आहे.
जिल्ह्यात 13 व 14 जून रोजी मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी झाली. यावेळी देखील या पुलाचा भराव काही प्रमाणावर वाहून गेला होता. यावेळी सरपंच माजगाव यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला पत्र दिले होते. अतिवृष्टीमुळे मजगांव बौद्धवाडी येथील साकवाचे नदीच्या पाण्याचा प्रवाह बदलल्याने तसेच नदीतील गाळ वाहुन गेल्याने साकवालगत खड्डा निर्माण झाला आहे. त्यामुळे साकवाच्या एका बाजुने उतरण्यासाठी असलेल्या संरक्षक कठड्याचे नुकसान झाले आहे. सदर नदीमध्ये गाळाचे मोठ्या प्रमाणात संचयन झाले आहे. पाण्याच्या प्रवाहामुळे सदरचा गाळ वाहुन येत आहे त्यामुळे वारंवार अश्या प्रकारचे नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी सदर नदीतील गाळ काढण्याबाबत संबंधित विभागास अवगत करावे व साकवाची पाहाणी करुन याबाबत आवश्यक ती कार्यवाही आपले स्तरावरुन करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली होती. मात्र याकडे दुर्लक्ष केल्याने मोठी दुर्घटना झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.









