रत्नागिरी:- उत्पन्नात वाढ करण्याबरोबरच शेतकर्यांची आर्थिक ताकद सक्षम करण्यासाठी जे शेतकरी मागणी करतील अशा प्रत्येक शेतकर्याला कृषी विभागामार्फत ठिबक सिंचन यंत्रणा देण्यात येण़ार आहे. मागेल त्याला शेततळे या धर्तीवर आता मागेल त्याला ठिबक ही योजनाही राबविण्यात येणार आहे.
कोकणातील पावसाच्या चार महिन्यात लाखो लिटर पाणी वाया जाते. वाया जाणारे पाणी सिंचन क्षेत्राकडे वळवून कोकणातील लागवडी योग्य 100 टक्के क्षेत्र ठिबक सिंचनाखाली आणून जमीन भिजविण्याचा उद्देश शासनाने ठेवला आहे. यासाठी हजारो एकर पडीक क्षेत्र ओलिताखाली आणण्यात येणार आहे. जे शेतकरी ठिबक यंत्रणेची मागणी करतील त्यांना प्रत्येकांना या योजनेत समाविष्ट करण्यात येणार आहे. यासाठी ठिबक यंत्रणा अनुदानावर उपलब्ध करुन देण्यासाठी कृषी विभगाने पुढाकार घेतला आहे. शेतकर्यांचे शेतीचे उत्पन्न वाढावे व तसेच मातीचा पोत सुधारावा यासाठी प्रत्येक शेतकर्याने आपले शेती क्षेत्र ठिबक सिंचनाखाली आणणे आवश्यक आहे. जे शेतकरी मागणी करतील अशा प्रत्येक शेतकर्याला कृषी विभागामार्फत ठिबक सिंचन यंत्रणा दिली जाईल, अशी माहिती कृषी अधीक्षक शिवराज घोपडे यांनी दिली.









