मांडवी जेटीवरील पथदीपांची अज्ञातांकडून तोडफोड

कठोर कारवाई करण्याची मागणी

रत्नागिरी:- अज्ञात समाजकंटकांनी मांडवी जेटीवरील पथदीपांची मोडतोड करून शासकीय मालमत्तेचे नुकसान केलेले आहे. रात्रीच्यावेळी येथे कोणतीही सुरक्षाव्यवस्था नसल्यामुळे ही घटना घडली आहे. भविष्यात जेटीवर अघटित घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे केलेल्या कृत्याची सीसीटीव्ही फूटेजमध्ये पाहणी करून समाजकंटकांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी शहरातील ६२ सुज्ञ व ज्येष्ठ नागरिकांनी स्वाक्षरी केलेले निवेदन पालिका मुख्याधिकाऱ्यांसह पोलिस, पालकमंत्र्यांना देण्यात आले आहे.

येथील जेटी व मांडवी बीच पाहण्यासाठी अनेक नागरिक येत असतात. मांडवी जेटीचे सुशोभीकरण केल्यामुळे सौंदर्यात आणखी भर पडली आहे; परंतु या जेटीची देखभाल दुरुस्ती, साफसफाई केली जात नाही. त्यामुळे तेथे अस्वच्छता निर्माण झाली आहे. १६ नोव्हेंबरला रात्रीच्या वेळेस काही समाजकंटकांनी जेटीवरील पथदीपांची मोडतोड केली. रात्रीच्यावेळी येथे कोणतीही सुरक्षाव्यवस्था नसल्यामुळे भविष्यात जेटीवर अघटित घटना घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे या समाजकंटकांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करावी, असे निवेदनात म्हटले आहे.