रत्नागिरी:- शहरात मद्यपी वेगवेगळे फंडे वापरत असल्याचे निदर्शनास येत आहेत. सार्वजनिक ठिकाणचा आडोसा, झाडीझुडपात तर समुद्रकिनारी चक्क बारच्या समोर असलेल्या कठड्यावर बसून दारू पिण्याचा आनंद घेताना दिसत आहेत. शनिवारी शहर पोलिसांनी सार्वजनिक ठिकाणी दारू पिणाऱ्या चार तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सातत्याने मद्यपींवर कारवाई होत आहे. मात्र, मद्यपींवरील दंडात्मक कारवाईमुळे जिल्ह्यात मद्यपी सहीसलामत सुटत असल्याचे चित्र आहे.
गेल्या आठवडाभरात शहर पोलिसांनी दहा ते पंधरा मद्यपींवर कारवाई केली. मात्र, सार्वजनिक ठिकाणी दारू पिणाऱ्यांचे प्रमाण काही केल्या कमी झालेले नाही. दिवसागणिक दोन ते चार जणांवर पोलिसांकडून कारवाई केली जात आहे. यामध्ये ग्रामीण पोलिसही कारवाई करत आहेत. त्या ठिकाणी तर रस्त्याच्या बाजूला, झाडीझुडपाचा आधार घेतला जात आहे. शनिवारी (ता. २८) सायंकाळी संशयित अनंत हंजप्पा तळवार (वय २५, रा. मुरुगवाडा, भैरी मंदिर रत्नागिरी), श्रेयस अविनाश पंडीत (२३, रा. लक्ष्मीनगर, रत्नागिरी), अनिल भागोजी जांगले (३४, रा. नगर परिषदेजवळ, रत्नागिरी), श्रीकांत शिवाप्पा राठोड (२७, रा. मुरुगवाडा, रत्नागिरी) असे संशयित तरुण मांडवी किनारी बीचवर दारू पिताना आढळल्याचे पोलिसांनी सांगितले.
याप्रकरणी पोलिस कॉन्स्टेबल अमित पालवे, पोलिस हेड कॉन्स्टेबल आशिष भालेकर यांनी शहर पोलिसात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.