मांडकी-पालवण येथे १३ पासून ‘ग्रामीण, कृषी व सहकार साहित्य संमेलन’

डॉ. शमिका चोरगे यांचे उपस्थित राहण्याचे आवाहन

चिपळूण:- कृषिभूषण डॉ. तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्थेच्या वतीने मांडकी-पालवण येथे येत्या १३, १४ व १५ फेब्रुवारी या कालावधीत भव्य ‘राज्यस्तरीय ग्रामीण, कृषी व सहकार साहित्य संमेलना’चे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने कोकणच्या भूमीत साहित्याचा आणि कृषी संस्कृतीचा जागर होणार असून, या सोहळ्याला साहित्यप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संमेलनाच्या प्रसिद्धी व प्रचार प्रमुख डॉ. सौ. शमिका चोरगे यांनी केले आहे.

​हे संमेलन संस्थेच्या मांडकी-पालवण येथील प्रशस्त क्रीडांगणावर संपन्न होणार आहे. ग्रामीण जीवन, शेतीपुढील आव्हाने आणि सहकार चळवळीची ताकद साहित्याच्या माध्यमातून समाजासमोर मांडणे हा या आयोजनामागचा मुख्य उद्देश आहे.

जिजामाता महिला कृषी महाविद्यालयाच्या प्राचार्या आणि संमेलनाच्या प्रसिद्धी प्रमुख डॉ. शमिका चोरगे यांनी माहिती दिली की, “हे संमेलन केवळ साहित्यिक चर्चांपुरते मर्यादित नसून ग्रामीण, कृषी आणि सहकार चळवळीतील कार्यकर्त्यांसाठी हे एक महत्त्वाचे दिशादर्शक व्यासपीठ ठरेल. यामध्ये होणारे परिसंवाद, कवी संमेलन आणि चर्चासत्रे ग्रामीण संस्कृतीचे दर्शन घडवतील. त्यामुळे कृषी क्षेत्रातील अभ्यासक, कार्यकर्ते आणि साहित्य रसिकांनी या तीन दिवसीय सोहळ्यात आवर्जून सहभागी व्हावे.”

​या ऐतिहासिक सोहळ्यासाठी चिपळूणसह संपूर्ण रत्नागिरी जिल्हा आणि महाराष्ट्रातील साहित्यिकांनी उपस्थित राहून या वैचारिक मेजवानीचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.