कुलगुरू डॉ. संजय भावे यांचे उपस्थितीचे आवाहन
चिपळूण:- तालुक्यातील मांडकी पालवण येथे ‘राज्यस्तरीय ग्रामीण, कृषी व सहकार मराठी साहित्य संमेलना’चा बिगुल वाजला आहे. १३, १४ आणि १५ फेब्रुवारी या तीन दिवसांच्या कालावधीत रंगणाऱ्या या ऐतिहासिक सोहळ्यासाठी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू आणि संमेलनाचे स्वागताध्यक्ष डॉ. संजय भावे यांनी सर्व साहित्यप्रेमी, शेतकरी आणि कार्यकर्त्यांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.
कृषिभूषण डॉ. तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्थेच्या माध्यमातून हे संमेलन आयोजित करण्यात आले आहे. ग्रामीण संस्कृती, प्रगतशील शेती आणि सहकार चळवळीला साहित्याच्या माध्यमातून एक नवी दिशा देणे, हा या संमेलनाचा मुख्य उद्देश आहे. कुलगुरू डॉ. संजय भावे यांनी सांगितले की, “हे संमेलन केवळ साहित्यापुरते मर्यादित नसून ते मातीतील विचारांचा जागर करणारे व्यासपीठ आहे.”
साहित्य संमेलनाची १३ फेब्रुवारी रोजी दुपारी भव्य ग्रंथदिंडीने संमेलनाची सुरुवात होईल. परिसंवादात शेती आणि सहकार क्षेत्रातील आव्हाने व संधी यावर नामवंत साहित्यिकांचे आणि तज्ज्ञांचे विचार ऐकण्याची संधी मिळणार आहे. संमेलनात ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम प्रभाकर मोरे यांच्यासह अनेक दिग्गज साहित्यिक आणि राजकीय नेते हजेरी लावणार आहेत. प्रयोगशील शेतकऱ्यांच्या यशोगाथा आणि ‘आता आत्महत्या थांबवूया’ यासारख्या संवेदनशील विषयांवर चर्चा होणार आहे.
कुलगुरूंचे आवाहन
“ग्रामीण जीवन आणि कृषी संस्कृती हा महाराष्ट्राचा आत्मा आहे. या समृद्ध वारशाचा आस्वाद घेण्यासाठी आणि दिग्गज साहित्यिकांचे विचार अनुभवण्यासाठी चिपळूणसह संपूर्ण महाराष्ट्रातील साहित्यप्रेमींनी या तीन दिवसीय ज्ञानयज्ञात सहभागी व्हावे.” — डॉ. संजय भावे (स्वागताध्यक्ष व कुलगुरू, दापोली कृषी विद्यापीठ)









