देवरुख:- स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवनिमित्त हर घर तिरंगा मोहिम राबवली जात आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील देवरूख कासारकोळवण येथील मांगले कुटुंबियांच्या दारात गेली 70 वर्ष स्वातंत्र्यदिनी तिरंगा फडकवला जात आहे. मांगले कुटुंबियांच्या दारात होणाऱ्या ध्वजारोहणाची परंपरा मांगले कुटुंबियांच्या तिसऱ्या पिढीने कायम ठेवली आहे.
मांगले कुटुंबियांच्या दारात होणाऱ्या ध्वजारोहणाला एक परंपरा आहे. 70 वर्षांपूर्वी कासारकोळवण गावचे पोलीस पाटील तात्या मांगले आणि सरपंच अण्णा मांगले यांच्या घरातूनच गावचा गाडा हाकला जायचा. त्यावेळी गावात कार्यालये नव्हती त्यामुळे ग्रामपंचायत,शाळा व सोसायटीचा कारभार सरपंचाच्या घरातूनच चालायचा.त्यामुळे दरवर्षी 15 ऑगस्टला स्वातंत्र्यदिनी आणि 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहण मांगले यांच्या दारात केले जायचे. कालांतराने ग्रामपंचायती,शाळा आणि सोसायटीच्या स्वतंत्र इमारती झाल्या आणि मांगले यांच्या घरातील कार्यालये बंद झाली. घरातील कार्यालये बंद झाली तरी दरवर्षी 15 ऑगस्टला स्वातंत्र्यदिनी आणि 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहणांची परंपरा मांगले कुटुंबियांनी सुरू ठेवली आहे. मांगले कुटुंबातील दुसऱ्या पिढीतील सुभाष मांगले,विश्वास मांगले आणि तिसऱ्या पिढीतील सचिन मांगले अमित मांगले,उमेश मांगले,वैभव मांगले,विनायक मांगले आणि धनंजय मांगले यांनी ही परंपरा सुरू ठेवली आहे.
हे अभिनेता वैभव मांगलेचं घर
कासारकोळवणच्या मांगले कुटुंबियांच्या दारात दरवर्षी स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहण होते.हे मांगले कुटुंबिय म्हणजेच अभिनेता वैभव मांगले यांचे घर.ध्वजारोहणाची हि परंपरा अखंड सुरू ठेवण्यात वैभव मांगले यांचेही योगदान आहे.