चिपळूण शहरातील घटना
चिपळूण:- शहरातील एका दुकानात काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्याची छेड काढणाऱ्या तरुणाला महिलेच्या नातेवाईकांनी चांगलाच चोप दिल्याची घटना शुक्रवारी दुपारी घडली. या प्रकारामुळे शहरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, चिपळूण शहरातील एका नामांकित दुकानात एक महिला कर्मचारी कार्यरत आहे. संबंधित तरुण गेल्या काही दिवसांपासून या महिलेची छेड काढत होता. वारंवार होणाऱ्या या त्रासाला कंटाळून पीडित महिलेने ही बाब आपल्या नातेवाईकांना सांगितली. शुक्रवारी दुपारी तो तरुण पुन्हा त्या ठिकाणी आला असता, दबा धरून बसलेल्या महिलेच्या नातेवाईकांनी त्याला गाठले. संतापलेल्या नातेवाईकांनी त्या तरुणाला भरबाजारात चांगलाच चोप दिला.
या राड्यामुळे परिसरात बघ्यांची मोठी गर्दी जमली होती आणि काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली. घटनेनंतर दोन्ही गट पोलीस ठाण्यात पोहोचले. छेडछाड केल्याप्रकरणी महिलेच्या बाजूने, तर मारहाण केल्याप्रकरणी तरुणाच्या बाजूने अशा परस्परांविरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.









