महिला रुग्णालयात नातेवाईकांना शौचालयाचा वापर करण्यावर बंदीचा फतवा

रत्नागिरी:-महिला रुग्णालयातील भोंगळ कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे. आता तर रुग्णांच्या नातेवाईकांनाच त्रास देण्याचा प्रकार सुरू झाला असून रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना शौचालय वापरण्यास मनाई केल्याने या नातेवाईकांची मोठी गैरसोय झाली आहे. याबाबत विचारणा केली असता तुम्ही कुठेपण जा, असे सांगून अरेरावीची भाषा वापरली जात आहे.

महिला रुग्णालय या ना त्या कारणातून नेहमीच चर्चेत येते. यापूर्वी मृत झालेली महिला पोर्टलवर जिवंत दाखवण्यात आली. याविरोधात तक्रारदाराने तक्रार करूनदेखील जिल्हा रुग्णालय त्याची कोणतीही जबाबदारी घेण्यास तयार नाही. यावरून न्यायालयीन लढाई सुरू होण्याची शक्यता असताना आता महिला रुग्णालयात नवनवीन निर्णय घेतले जात आहेत.
सध्या कोरोनाचे रुग्ण वाढू लागले आहेत. त्यामुळे महिला रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांचे नातेवाईक रुग्णालयाबाहेरच ठाण मांडून आहेत. या नातेवाईकांकरीता निवार्‍याची कोणतीही व्यवस्था त्याठिकाणी नाही. यापूर्वी महिला रुग्णालयातील शौचालयाचा वापर रुग्णांचे नातेवाईक करत होते. आता मात्र येथील काही कर्मचार्‍यांनी स्वमर्जीत हे शौचालय बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. गेले 4 दिवस रुग्णांच्या नातेवाईकांसाठी शौचालय बंद झाल्याने या नातेवाईकांनी प्रात:विधीसाठी जायचे तरी कुठे? असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. याबाबत काही नातेवाईकांनी महिला रुग्णालयातील कर्मचार्‍यांना याबाबत विचारले असता नातेवाईकांना उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. प्रात:विधीसाठी तुम्ही कुठेही जा, मात्र तुम्हाला येथील शौचालयात जाता येणार  नाही, असे ठणकावून कर्मचारी सांगत आहेत.
याबाबत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संघमित्रा फुले यांना विचारले असता त्यांनीदेखील आपले हात वर करून नोडल ऑफीसर डॉ. कुंबरे याहेत त्यांच्याशी संपर्क करा, असे सांगून आपली जबाबदारी झटकून दिली आहे. या प्रकारामुळे रुग्णांचे नातेवाईक संतप्त झाले आहेत.

लवकरच बदल : ना. सामंत
रम्यान, जिल्हा रुग्णालय आणि महिला रुग्णालयाच्या कारभाराबाबत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री ना. उदय सामंत यांच्याकडे अनेक तक्रारी गेल्या होत्या. या तक्रारी वाढत असतानाच जिल्हाधिकार्‍यांच्या उपस्थितीत एक महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीत जिल्हा शल्य चिकित्सक आणि जिल्हा रुग्णालयाचा कारभार यावर गरमागरम चर्चा झाली. यावर बोलनाता ना. सामंत यांनी सांगितले की, ‘आता काही बोलू नका, लवकरच बदल दिसेल’, असे सांगून ना. सामंत यांनीदेखील जिल्हा शल्य चिकित्सकांच्या कारभाराबाबत नाराजी व्यक्त केली.