रत्नागिरी:- महिलांचे आरोग्य उत्तम राहिले तर कुटुंब सुखी राहील. या उदात्त हेतुने महिलांचे सुरक्षित आरोग्य तपासणी शिबिर घेतले. याला चांगला प्रतिसाद मिळाला. यापूर्वी शाळकरी मुलांच्या आरोग्याची तपासणी केली. तेव्हाही अनेक मुलांच्या हृदयाला होल असल्याचा गंभीर प्रकार पुढे आला. त्यापैकी काही मुलांवर मोफत शस्त्रक्रिया केली. या दोन्ही शिबिरांमध्ये मुलं आणि महिलांचे आयुष्य वाढले हाच आमच्यासाठी मोठा आशिर्वाद आहे. राजकारणा पलिकडे जाऊन आमचे हे समाजकार्य आहे. जिल्हा आरोग्याच्यादृष्टीने राज्यात पहिला येईल, असे पुढील दोन वर्षात काम करू, असे आश्र्वासन पालकमंत्री उदय सामंत यांनी दिले.
महिलांच्या सुरक्षित आरोग्य तपासणीसाठी आयोजित केलेल्या शिबिराच्या सांगता समारंभाप्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठले, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संघमित्रा फुले यांच्यासह अन्य आरोग्य अधिकारी, बाळासाहेबांची शिवसेना गटाच्या महिला संघटक सौ. स्मितल पावसकर, शिल्पा सुर्वे, कांचन नागवेकर यांच्यासह शहर प्रमुख बिपिन बंदरकर, बाबू म्हाप, राजन शेट्ये यांच्यास अनेक समर्थक आणि मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.
उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या पुढाकाराने आणि महिला पदाधिकार्यांच्या आग्रहाखातर जिल्हा आरोग्य विभाग, जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या संयुक्त विद्यमाने 3 दिवसाचे आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते. याला सुमारे 856 महिलांनी लाभ घेतला. तसेच आज तज्ज्ञ वैद्यकीय अधिकार्यांच्या माध्यमातून महिलांना आरोग्यविषयक सल्ले देण्यात आले.
यावेळी मंत्री सामंत म्हणाले, शिबिराच्या निमित्ताने उपस्थित असेलल्या महिलांच्या उपस्थितीचा विचार झाला पाहिजे. आरोग्य सेवा देण्याची जाबाबदारी आरोग्य विभागाची आहे. महिला येत नसतील तर डॉक्टरांनी महिलांपर्यंत पोहचले पाहिजे, अशा प्रकारचे काम आरोग्य विभागाने करायला हवे. साडे सात वर्षांपासून स्थानिक पालकमंत्री नाही. आता स्थानिक पालकमंत्री मिळाला आहे. महिलांना चांगली आरोग्य सुविधा देणे सरकार म्हणून माझी जबाबदारी आहे.
आजची ही उपस्थिती आरोग्य अधिकार्यांच्या डोळ्यात अंजन घालणारी आहे. कारण आजवर कर्मचारी कमी आहेत, अशी कारणे अधिकारी देत आले आहेत. अशी किती दिवस ही कारण दिली जाणार आहेत? आता ते चालणार नाही. आरोग्य विभागानेही आपले काम दाखविण्याची गरज आहे. शाळकरी मुलांसाठी काही दिवसांपूर्वीच टुडी इको तपासणी घेण्यात आली होती. यावेळी जिल्ह्यातील 73 मुलांच्या हृदयाला होल असल्याचा गंभीर प्रकार तपासणीत पुढे आला. त्यापैकी 6 बालकांची मोफत शस्त्रक्रिया करून त्याचे आयुष्य वाढविण्यात आम्हाला यश आले. आता 856 महिलांची तपासणी करून त्यांच्यावर योग्य उपचार सुरू आहेत. शस्त्रक्रिया केलेली मुले आणि या महिलांचे यामुळे आयुष्य वाढले आहे. त्यांचे मिळालेले आशीर्वाद हेच आमचे समाधान आहे. आरोग्याच्यादृष्टीने गेल्या 15 वर्षांमध्ये जे काही झाले नाही , ते करून आणि महिलांचे आरोग्य सुधारू, असे ना. सामंत म्हणाले.