महिला बचत गटांना पोषण आहारातून मिळणारी रोजीरोटी हिरावून घेण्याचा घाट

रत्नागिरी:- शहरी भागातील शाळांमधील विद्यार्थ्यांना महिला बचत गटांमार्फत शालेय पोषण आहार दिला जात होता. त्यामुळे गेली अनेक वर्ष मुलांना दर्जेदार आहार मिळण्यासोबतच गरिब कुटुंबांतील महिलांना रोजीरोटी मिळाली होती. सरकारच्या नव्या धोरणामुळे महिला बचत गटाची रोजी रोटी हिरावून घेण्याची प्रक्रिया सुरु झाली असून परजिल्ह्यातील धनदांडग्या संस्थाना पोषण आहार पुरविण्याचा ठेका देण्यात येणार आहे.यासाठी चार कंपन्या तयार झाल्या आहे. त्यामुळे गेली अनेक वर्ष मुलांना दर्जेदार आहार देणार्‍या महिला बचत गटातील महिलांवर उपासमारीची वेळ येणार आहे. तर राज्याचे माजी उच्च व तंत्र शिक्षण मंत्र्यांच्या मतदार संघात हा घाट घातला जात असल्याने आर्श्चय व्यक्त होत आहे.आता आमदार उदय सामंत गरिब महिलांना रोजीरोटी मिळवून देतात का? याकडे सर्व महिला बचत गटातील महिलांचे लक्ष लागले आहे.

राज्यात शालेय पोषण आहार योजनेची अंमलबजावणी झाल्यानंतर तत्कालीन सरकारने महिला बचत गटाच्या सक्षमिकरणासाठी शालेय पोषण आहार पुरवठ्यासाठी महिला बचत गटांना प्राधान्य देण्याचे आदेश दिले होते. त्याची प्रभावी अंमलबजावणी राज्यात करण्यात आली. घरातील अन्न शिजवणार्‍या महिला चिमुकल्यांनाही घराप्रमाणे दर्जेदार जेवण देत होत्या. कोरोना प्रादुर्भावाच्या काणात शाळा बंद असल्याने त्यामध्ये खंड पडला होता. मात्र आता नव्या शैक्षणिक वर्षाला सुरुवात झाल्यानंतर गेले दोन वर्ष बंद असलेली रोजीरोटी पुन्हा मिळेल अशा आशेवर असलेल्या  रत्नागिरी शहरातील महिला बचत गटांच्या महिलाची रोजीरोटी शसनाच्या नव्या आदेशाने हिरावून घेतली आहे.

शालेय पोषण आहार पुरवठ्यासाठी आता बचत गट ऐवजी खाजगी संस्थाची निवड करण्यात येणार आहे.त्यासाठी निविदा काढण्यात आल्या आहे. एक स्थानिक निविदा वगळता परराज्यातील धनदांडग्यांच्या संस्थांनी  आहार पुवण्याचा ठेका मिळण्यासाठी निविदा भरल्या आहे.
 

ठाणे, सांगली, इंचलकरंजी येथील संस्था रत्नागिरी शहरातील शाळांमधील विद्यार्थ्यांना आहाराचा पुरवठा करणार आहेत. रत्नागिरी शहरात 7 हजार 500 विद्यार्थी असून त्यामध्ये पालिकेच्या शाळांसह शहरातील अनुदानीत खाजगी शाळांचाही समावेश आहे. चारपैकी  तीन संस्थांची निवड करण्यात येणार आहे. त्या तीन संस्थांना प्रत्येकी 2 हजार 500 विद्यार्थ्यांना आहार पुरवण्याचा ठेका देण्यात येणार आहे. त्यासाठी आवश्यक किचनची पहाणी शिक्षण विभागाकडून करण्यात आली असल्याने आता बचत गटाच्या महिलांची रोजी रोटी हिरावली जाणार आहे. हे निश्चित झाले आहे.

ना.एकनाथ शिंदे नवे मु्ख्यमंत्री झाल्यानंतर शिंदे गट व भाजपाचे सरकार सर्वसामान्य जनतेला रोजीरोटी उपलब्ध करुन देईल  अशी आशा असतानाचा शिंदे गटातील पहिल्या फळीचे नेते आ.उदय सामंत यांच्याच मतदार संघात गरिब महिलांची रोजीरोटी हिरावून घेण्याचे काम सुरु झाले आहे. त्यामुळे मुंबईत असलेले आ.उदय सामंत आता कोणती भूमिका घेतात ? महिला बचत गटाची रोजीरोटी त्यांना पुन्हा मिळवूण देतात का? याकडेच सर्व महिला बचात गटातील महिलांचे लक्ष लागले आहे.

पोषण आहार पुरविण्याचा ठेका मिळवण्यासाठी ठेवण्यात आलेले निकष अतिषय जाचक आहे. त्यातील एकूण क्षेत्रफण, किचनचे क्षेत्रफण, कर्मचारी संख्या आदि अटी घालण्यात आल्याने सर्व सामान्य बचत गटातील महिलांना ते निकष पुर्ण करणे शक्य नाही. त्यामुणे त्यांना निविदा भरणे शक्य झाले नाही.त्याचा फायदा परजिल्ह्यातील कंपन्यांनी उठवला आहे.