महिला प्राध्यापिकेचे पहलगाम हल्ल्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य

रत्नागिरीतील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्रकार

रत्नागिरी:- रत्नागिरीच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात पहलगाम हल्ला या विषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या महिला प्राध्यापिकेला हिंदुत्ववादी संघटनांसह संविधान सन्मान मंच आक्रमक होत त्यांनी जाब विचारला. ज्या विद्यार्थ्याना हे शिकवले गेले त्यांनीही याला दुजोरा दिल्यानंतर या प्राध्यापिकेला निलंबित करण्याची मागणी पदाधिकाऱ्यांनी केली आहे.

रत्नागिरीतील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात संविधान हा विषय दुसऱ्या वर्षाच्या AI&DS च्या विद्यार्थ्याना शिकवणाऱ्या महिला प्राध्यापिका सुवर्णा दारोकार यांनी गेल्या आठवड्यात मुलांना वर्गाचा दरवाजा बंद करून पहलगाम हल्ला, भारतातील जातीपाती, भेदभाव, मनुस्मृती, स्त्रियांना हिंदू धर्मामध्ये दिला जाणारा दर्जा आणि सती प्रथा, मुस्लीम ट्रस्ट या विषयावर बोलताना काही आक्षेपार्ह वक्तव्ये केल्याची माहिती पुढे आली. तर पहलगाम येथे दहशतवादी हल्ला झालाच नाही आपण ते काही बघायला तिकडे नव्हतो असे म्हणत खोट्या बातम्या मीडियाद्वारे पटापट पसरवल्या असल्याचे वक्तव्य केल्याच्या तक्रारी हिंदू संघटनांसमोर आल्या.

याची पदाधिकाऱ्यानी तत्काळ दखल घेत शुक्रवारी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय गाठले आणि प्राचार्यांना याबाबत वस्तुस्थिती विचाण्यात आली. त्यानंतर संबंधित महिला प्राध्यापिका सुवर्णा दारोकर यानाही बोलवण्यात आले. आपण असे काही बोललोच नाही असे त्या म्हटल्यानंतर त्यांच्या त्या दुसर्‍या वर्गातील मुलांना बोलावून समोरासमोर गोष्टी स्पष्ट करण्यात आल्या. त्यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांनी प्राध्यापक मॅडम यांनी अशी वक्तव्ये केल्याचे प्राचार्य आणि हिंदू संघटनाच्या पदाधिकाऱ्यासमोर सांगितले. त्यानंतर या महिला प्राध्यापकांच्या निलंबनाची मागणी प्राचार्यांकडे करण्यात आली.