महिला परिचर महासंघ आझाद मैदानावर देणार धरणे

रत्नागिरी:- महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद महिला परिचर महासंघातर्फे विविध मागण्यांसाठी 25 ते 27 जुलै या कालावधीत मुंबई येथील आझाद मैदानावर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. याबाबतचे निवेदन जिल्हा शाखेतर्फे जिल्हा परिषद प्रशासनाला दिले आहे.

गेली अनेक वर्षे या महिला परिचर विविध मागण्यांसाठी शासनाकडे संघर्ष करीत आहेत. किमान वेतनासाठी व इतर प्रलंबित मागण्यांसाठी 25 ते 27 या कालावधीत आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरूद्ध आठल्ये यांना निवेदन देण्यात आले आहे. यावेळी संघटनेच्या जिल्हाध्यक्षा आकांक्षा कांबळे व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

गरजेवर आधारित किमान वेतन देण्यात यावे, नियमित सेवेत कायम करावे, अंशकालीन नावात बदल करावा, रिक्त पदावर वारसदारांना प्रथम प्राधान्य देण्यात यावे, दरवर्षी गणवेश व भाऊबिज 2 हजार रूपये देण्यात यावी, दर महिन्याच्या 5 तारखेच्या आत मानधन प्रदान करण्यात यावे आदी मागण्यांचे निवेदन देण्यात आले.