महिला दिनी पाणी पुरवठा योजनांची देखभाल, दुरुस्ती महिलांच्या हाती

रत्नागिरी:- जागतिक महिला दिनानिमित्त जिल्ह्यातील नऊ तालुक्यांमध्ये पाणी पुरवठा योजनांची देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी महिला बचत गटाकडे देण्याचा निर्णय जिल्हापरिषदेने घेतला आहे. प्रायोगिक तत्त्वावर निवोशी (ता. लांजा) येथील योजना क्रांती उत्पादक महिला बचत गटाकडे सोपवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्ह्याच्या इतिहासातील असा पहिलाच नाविन्यपूर्ण उपक्रम असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी किर्ती किरण पुजार यांनी सांगितले.

जिल्ह्यात जल जीवन मिशन कार्यक्रम राबविण्यात येत आहे. सर्व कुटुंबाना २०२४ पर्यंत प्रत्येक घरात वैयक्तिक नळ जोडणीद्वारे प्रतीदिन दरडोई किमान ५५ लिटर पाणी दिले जाणार आहे. पाण्याचा दर्जा चांगला राहील याकडे लक्ष दिले जाणार आहे. सध्या जिल्ह्यात हर घर नल सें जल हा उत्सव साजरा करण्यात येत आहे. जलजीवनमधून जिल्ह्यात ७०० कोटी रुपयांची कामे करण्यात येत आहेत. आतापर्यंत ५६ गावे हर घर जल नल म्हणून जाहीर करण्यासाठी सज्ज आहेत. स्वच्छ सुजल शक्ती सन्मान योजनेंतर्ग इंदवटी महसूल गावातील निवोशी (ता. लांजा) हे हर घर नल सें जल म्हणून सरपंच विनोद सखाराम गुरव यांनी विशेष ग्रामसभेत घोषित केले आहे. या गावातील योजना क्रांती उत्पादक महिला बचत गटाकडे पाणी पुरवठा योजनाची देखभाल व दुरुस्ती करण्यासाठी प्रायोगीक तत्वावर सोपवण्यात आली आहे. ही जबाबदारी बचत गटाने स्वयंप्रेरणेने स्विकारलेली आहे. महाराष्ट्र जीवनउन्नोती (उमेद) अभियानातून या बचत गटांची नोंदणी झाली आहे. या गटात १७ महिला कार्यरत आहेत. यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी किर्ती किरण पुजार, प्रकल्प संचालक श्रीमती एन. डी. घाणेकर, प्रकल्प संचालक राहूल देसाई, कार्यकारी अभियंता मयुरी पाटील यांनी पुढाकार घेतला आहे.

ही आहेत बचत गटाची कामे

बचत गटाने योजनेची १०० टक्के पाणीपट्टी वसूल करणे, स्रोतांचे स्वच्छता सर्वेक्षण करणे, नियमित पाण्याची माहिती देणे, रासायनिक व जैविक तपासणी करणे, किरकोळ दुरूस्ती ही कुशल – अकुशल मनुष्यबळाकडून करवून घेणे यासारखी कामे करण्याबाबतचा ठराव करण्यात आला.