रत्नागिरी:- कोरोना काळात स्वत:चा जीव धोक्यात घालून महिला, जिल्हा रुग्णालयात सेवा बाजाविणार्या वॉर्डबायना तब्बल सहा महिन्यांचे वेतन देण्यात आलेले नसल्याचे उघड झाले आहे. उच्चशिक्षित तरुण कोरोना काळात वार्डबाय म्हणून सेवेत आले खरे. मात्र आता वेतनासाठी त्यांची परवड होत आहे. ऑक्टोबर 2021 पासून वेतनच न झाल्याने त्यांच्या कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे आज रत्नागिरीच्या दौर्यावर येणारे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री ना.उदय सामंत वेतन न मिळालेल्या वॉर्डबायना दिलासा देतील का? याकडे सर्व कंत्राटी कर्मचार्यांचे लक्ष लागले आहे.
कोरोना काळात आरोग्य विभागकडे अपुरा कर्मचारी वर्ग असल्याने कंत्राटी कर्मचार्यांची भरती करण्यात आली. प्रतिदिन 400 रु.प्रमाणे वेतन देण्याच्या अटींवर भरती करण्यात आली. केवळ वॉर्डबाय हे एकमेव पद असल्याने भविष्यात आपण शासकिय सेवेत कायम होऊ या अपेक्षेने अनेक उच्चेशिक्षित तरुण यावेळी वॉर्डबाय म्हणून रुजू झाले होते. त्यामध्ये इंजिनिअर, बीए, बीकॉम झालेल्या तरुणांचा समावेश आहे. मात्र कायमस्वरुपी नोकरी मिळण्या ऐवजी त्यांना महिन्याच्या मानधनासाठी सहा सहा महिने थांबावे लागत आहे. याची सर्वाधिक झळ त्यांच्या कुटुंबियांना बसत असून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.
जिल्हा शासकिय रुग्णालयाने वॉर्डबायच्या वेतनासाठी 20 लाख 70 हजार रु.चा निधी जिल्हा प्रशासनासह आरोग्य विभागाकडे मागितला होता. मात्र अद्यापपर्यंत यातील एक रुपयाही प्राप्त झालेला नाही. कोरोना काळात करोडो रुपये खर्च करणार्या शासनाकडे वॉर्डबायच्या वेतनासाठी 20 लाख रुपये द्यायला नाही का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.