रत्नागिरी:- महिला केंद्रित पर्यटन धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीकरिता पर्यटन संचालनालयामध्ये महिला पर्यटन धोरण कक्ष स्थापन करण्यात येणार आहे. महिलांना पर्यटन क्षेत्रामध्ये व्यवसाय व रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी तयार करण्यात आलेल्या आई या महिला केंद्रित पर्यटन धोरणासाठी वार्षिक कृती आराखडा निश्चित करण्यात आला आहे.
पर्यटन क्षेत्रात महिलांमध्ये उद्योजकता आणि नेतृत्वगुण विकसित करण्याच्या उद्देशाने महिलांच्या सक्षमीकरणासाठी ‘आई’ महिला केंद्रित पर्यटन धोरण राबविण्यात येत आहे. महिला उद्योजकता विकास, महिलांकरिता पायाभूत सुविधा, महिला पर्यटकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देणे, महिला पर्यटकांसाठी कस्टमाईज्ड उत्पादने, सवलती, प्रवास आणि पर्यटन विकास ही या धोरणाची पंचसुत्री महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळामार्फत तयार करण्यात आली आहे.
पर्यटन क्षेत्रातील महिला उद्योजकांचा सहभाग वाढवण्यासाठी प्रत्येक तालुक्यात पर्यटन संचालनालयाकडे नोंदणीकृत महिलांच्या मालकीच्या व त्यांनी चालवलेल्या 10 पर्यटन व्यवसाय उभारणीसाठी प्रयत्न केले जातील. त्यासाठी मान्यताप्राप्त बँकांमार्फत घेतलेल्या 15 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जाच्या रकमेवरील व्याजाची रक्कम 12 टक्केच्या मर्यादेत, त्यांच्या आधार लिंक बँकखात्यात पूर्ण कर्ज परतफेड होईपर्यंत किंवा सात वर्षे कालावधीपर्यंत किंवा व्याजाची रक्कम 4 लाख 50 हजारांच्या मर्यादेपर्यंत या तीन पर्यायांपैकी जे आधी घडेल तोपर्यंत दरमहा पुढील अटींच्या अधीन राहून जमा करण्यात येईल, अशी माहिती देण्यात आली आहे.
पर्यटन संचालनालयाकडे नोंदणीकृत असला पाहिजे. पर्यटन व्यवसाय महिलांच्या मालकीच्या व त्यांनी चालवलेल्या असल्या पाहिजेत. महिलांच्या मालकीच्या हॉटेल, रेस्टॉरंट्समध्ये 50 टक्के व्यवस्थापकीय व इतर कर्मचारी महिला असणे आवश्यक राहील.
महिलांच्या मालकीच्या टूर आणि ट्रॅव्हल्स एजन्सीमध्ये 50 टक्के कर्मचारी महिला असणे आवश्यक राहील. पर्यटन व्यवसायाकरिता आवश्यक सर्व परवानग्या प्राप्त असाव्यात, कर्जाचे हप्ते वेळेत भरणे आवश्यक आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या मालमत्तांच्या ठिकाणी, महिला बचतगटांना हस्तकला, कलाकृती, प्रक्रिया केलेले खाद्यपदार्थ इत्यादींच्या विक्रीसाठी स्टॉल, जागा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.