रत्नागिरी:- दहा वावामध्ये गिलनेटद्वारे मासेमारी करणार्या मच्छीमारांपुढे महिन्याभरानंतर पुन्हा जेलीफिशच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. जेलीफिशमुळे बांगडा मासा खोल समुद्राच्या दिशेने वळल्याने छोट्या मच्छीमारांना मासळी मिळत नाही. तर झुंडीने जाळ्यात सापडणार्या जेलीफिशमुळे नुकसान होत आहेत. मतलई वार्यांमुळे मिर्या ते गणपतीपुळेसह जिल्ह्याच्या किनारी भागात जेलीफिशचा आढळ वाढल्याचे मच्छीमारांचे म्हणणे आहे.
नोव्हेंबर महिन्यामध्ये जेलीफिशचा वावर रत्नागिरी जिल्ह्याच्या वाढला होता. किनारी भागात झुंडीने सापडत होते. डिसेंबर महिन्यात प्रमाण कमी होऊ लागले. त्यामुळे गिलनेटद्वारे मासेमारी करणार्यांना दिलासा मिळाला. त्यानंतर बांगडा, सुरमईसह कोळंबी मच्छीमारांच्या जाळ्यात सापडू लागली. मार्गशिर्ष महिन्यामुळे गेले महिनाभर मासळीसह मटण, चिकनची मागणी कमी झाली होती. त्याचा फटका मच्छीमारांनाही बसला. मासे मिळू लागले पण मागणी कमी झाली. त्याचा दरावरही परिणाम झाला होता. गेल्या आठ ते दहा दिवसात मतलई वारे सुरु झाल्यामुळे जेलीफिशच्या झुंडीच्या झुंडी रत्नागिरीच्या किनारी भागात आढळत आहेत. मिर्यापासून ते गणपतीपुळेपर्यंत मासेमारी करणार्यांच्या जाळ्यात जेलीफिश सापडत आहे. गेल्या काही दिवसात बांगडा मासा किनारी भागाकडून खोल समुद्राकडे वळला आहे. परिणामी मासेच मिळत नसल्याने गिलनेटवाल्यांची परिस्थिती गंभीर झाली आहे. मासेमारीसाठी गेलेल्यांना दहा ते बारा किलो मासाच मिळत असल्याने आर्थिक भुर्दंड बसत आहे. इंधन दरवाढीने मच्छीमारांचा कणा मोडला आहे. त्यात अपेक्षित मासे मिळत नसल्याने भर पडली आहे. जेलीफिशच्या झुंडीमुळे मच्छीमारांच्या जाळ्यांचे नुकसान होत आहे. प्रत्येकवेळी हजारो रुपयांचा फटका बसत आहे. फाटलेल्या जाळ्यांची भरपाइ मिळत नसल्याने मच्छीमार हवालदिल झाले आहेत. सध्या बांगड्याला ५० ते ८० रुपये किलोला दर मिळतो. तर सुरमईचा दर २०० रुपये किलो आहे.
जेलीफिशबरोबरीने डॉल्फीनचाही त्रास मच्छीमारांना होत आहे. दहा ते बारा डॉल्फीन एकाचवेळी जाळ्यात घुसले की ती फाडूनच बाहेर येतात. याचा अनेक मच्छीमारांना अनुभव येत आहे. कासारवेलीतील छोटे मच्छीमार गेले पंधरा दिवस मासेमारीसाठीच समुद्रात गेलले नाहीत असे मच्छीमार अभय लाकडे यांनी सांगितले. मासे मिळत नसल्याने त्यांच्यावर ही वेळ आली आहे.









