रत्नागिरी:- राज्याचे उद्योगमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री ना. उदय सामंत यांनी रत्नागिरीतील बंद पडलेले दोन उद्योग सुरु करण्यात पुढाकार घेतला असून, येत्या महिनाभरात वेरॉन इंडस्ट्री व भारती शिपयार्ड हे उद्योग सुरु होणार आहेत. यासाठी दोन्ही ठिकाणी मिळून सुमारे पाचशे कोटीहून अधिक रुपयांची गुंतवणूक होणार असून टप्प्याटप्प्याने स्थानिक कामगारांना कामावर घेतले जाणार आहे. यामुळे सुमारे तीन हजारजणांना रोजगार उपलब्ध होणार असल्याची माहिती मंत्री ना. उदय सामंत यांनी दिली.
रत्नागिरीतील एमआयडीसी येथे पालकमंत्री व ग्रामस्थांसोबत झालेल्या बैठकीला मिर्या येथील भारती शिपयार्ड कंपनी सुरु करण्यासाठी पाऊल टाकणारे ह्युमन मरीन सर्व्हीसेस प्रा. लि.चे धनंजय मिश्रा आणि वेरॉन इंडस्ट्री सुरु करण्यासाठी पाऊल टाकणारे नागपूरच्या सियान अॅग्रोचे गणेश तुरेराव उपस्थित होते. या दोन्ही कंपन्यांच्या संचालकांनी घेतलेल्या भूमिकेचे रत्नागिरीकरांना स्वागत केले.
या बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना उद्योगमंत्री ना. सामंत म्हणाले की, भारती शिपयार्ड सुरु होण्यासाठी एमआयडीसी व महसूल प्रशासन आणि स्थानिक ग्रामस्थ ह्युमन मरीनला येणार्या अडचणी दूर करण्यास सहकार्य करणार आहेत. भारती शिपयार्डने मिर्या ग्रामपंचायतीची थकवलेली 25 लाखाची घरपट्टी नवी कंपनी येत्या काही दिवसात जमा ग्रामपंचायतीकडे जमा करणार आहे. त्याचप्रमाणे ठेकेदारांचे थकलेल्या पैशातील निम्मे पैसे टप्प्याटप्प्याने देणार आहे. कंपनीच्या कर्मचार्यांचे थकलेले पगारही दिले जाणार आहेत. त्याचप्रमाणे कंपनीत स्थानिक कामगारांना प्राधान्य दिले जाणार असले तरी सुरुवातीला अडीचशे, पाचशे व हजार असे टप्प्याटप्प्याने घेतले जाणार आहेत. या कंपनीतून दोन हजारजणांना रोजगार मिळेल अशी अपेक्षा ना. सामंत यांनी व्यक्त केली. 24 डिसेंबरपासून भारती शिपयार्ड सुरु होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. ग्रामस्थांनी आपली कंपनी समजून त्यांना सहकार्य करण्याचे आश्वासन दिले असल्याचेही ना. सामंत यांनी स्पष्ट केले.
कोरोना काळापासून बंद पडलेली वेरॉन इंडस्ट्रीही सुरु करण्याच्या दृष्टीने मागील काही महिने प्रयत्न सुरु होते, त्याला यश आले असून नागपूर येथील सियान अॅग्रो ही कंपनी येत्या दोन-अडीच महिन्यात कंपनी सुरु करणार आहे. याठिकाणी सुमारे शंभर कोटीची गुंतवणूक करणार असून यात सुरुवातील दोनशे ते अडीचशेजणांना रोजगार मिळणार असल्याचे ना. सामंत यांनी सांगितले. यावेळी जिल्हाधिकारी, मुख्यकार्यकारी अधिकारी, एमआयडीसीच्या विभागीय अधिकारी उपस्थित होत्या. यावेळी बोलताना भारती शिपयार्ड सुरु करण्यात पुढाकार घेणारे धनंजय मिश्रा म्हणाले की, येथील कामगारांचे प्रश्न आपण प्राधान्याने सोडवणार असून, स्थानिकांना रोजगार उपलब्ध करुन देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्याचप्रमाणे सियान अॅग्रोचे गणेश तुरेराव यांनीही पूर्वीच्या लोकांना रोजगार टप्प्याटप्याने देणार असल्याचे स्पष्ट केले.