रत्नागिरी:- गेले एक महिना आठ दिवस बेपत्ता असलेल्या जयगड येथील नावेद-२ या मच्छीमारी नौकेचे अवशेष सापडले. मासेमारी करताना तेथील एका मच्छीमाराच्या जाळ्यामध्ये हे अवशेष आले. त्यामुळे ही नौका बुडाल्याचे निश्चित झाले आहे. यामध्ये जाळे, ॲन्कर, दोरीचा समावेश आहे. जयगड भागातच हे अवशेष मिळाले. या वस्तू नौका मालकाने ओळखून त्या आपल्याच नौकेवरील असल्याचे स्पष्ट केले.
जयगड येथून काही दिवसांपूर्वी मच्छीमारीसाठी गेलेली बोट सहा खलाशांसह बेपत्ता झाली होती. नौकेचा वेगवेगळ्या सुरक्षा यंत्रणेकडून शोध घेण्यात आला; मात्र सर्वांना अपयश आले. दरम्यान, अनिल आंबेरकर (वय ५०, रा. साखरीआगर-गुहागर) असे सहापैकी एका मृत खलाशाचे नाव आहे. उर्वरित मृतदेह अजून बेपत्ताच आहेत. बेपत्ता खलाशांमध्ये दत्तात्रय झगडे, दगडू तांडेल, अनिल आंबेरकर, गोकूळ नाटेकर, अमोल जाधव, सुरेश कांबळे आदींचा समावेश आहे.
नासिर हुसेनमियाँ संसारे यांच्या मालकीची ‘नावेद २’ ही मच्छीमारी बोट २६ ऑक्टोबरला जयगड बंदरातून मासेमारीसाठी रवाना झाली होती. ही बोट २८ ऑगस्टला जयगड बंदरात येणे अपेक्षित होती; मात्र ३० तारखेपर्यंत ही बोट जयगड बंदरात परत आली नाही. त्या बोटीशी संपर्क साधण्याचाही प्रयत्न करण्यात आला होता. तक्रार दाखल झाल्यानंतर बोटीचा शोध घेण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. तटरक्षक दलालाही याची माहिती देण्यात आली आहे. त्यानंतर मच्छीमारांना काहीतरी तरंगताना दिसले. तेव्हा कोस्टगार्डने २० वावात जाऊन पाहणी केली. यामध्ये एक मृतदेह हाती लागला होता. अनिल आंबेरकर असे त्या खलाशाचे नाव आहे. समुद्रात २० नॉटिकल परिसरात आढळला असल्याने बोटीला जलसमाधी मिळाली असावी, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. यावरून मच्छीमारांमध्ये संताप होता. सुरक्षा यंत्रणाला एखादी नौका बेपत्ता होते आणि काहीच माहिती मिळत नाही, यावरून मच्छीमार अस्वस्थ होते.
पाणबुड्या किंवा सोनार यंत्रणेद्वारे बेपत्ता नौकेचा शोध घेतला जाणार असल्याचे स्पष्ट केले होते. मात्र नजीर जांभारकर हे आज जयगड येथे मासेमारी करत असताना त्यांच्या जाळ्यामध्ये बोटीचा ॲन्कर, दोरी आणि जाळे त्यांना सापडले. त्याची माहिती नावेद-२ नौकेचे मालक संसारे यांना दिली. संसारे यांनी ते अवशेष पाहिल्यानंतर आपल्याच बोटीवरील हे आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले. या भागात नौका आहे, परंतु ती ओढता येणे शक्य नसल्याचे सांगितले जात आहे. प्रशासन आणि सुरक्षा यंत्रणा आता पुढे काय कार्यवाही करणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.