महाविद्यालये सुरू होण्याचा मुहूर्त लांबणीवर 

रत्नागिरी:- मुंबई विद्यापीठाने स्थानिक प्रशासनाकडून परवानगी घेऊन वरिष्ठ महाविद्यालय सुरू करण्याचे कळवले होते. मात्र, जिल्हाधिकार्‍यांनी सोमवारी सर्व महाविद्यालयांना प्राध्यापक आणि कर्मचार्‍यांची कोरोना चाचणी करूनच महाविद्यालय सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील 92 महाविद्यालये सुरू होण्यास अजूनही दोन ते तीन दिवसांचा कालावधी जाणार आहे.

कोरोनासंदर्भातील नियम पाळून सुरुवातीला नववी ते बारावी व नंतर पाचवी ते सातवीच्या शाळाही सुरू करण्यात आल्या. मात्र, महाविद्यालये बंदच असल्याने किमान प्रात्यक्षिकांसाठी तरी महाविद्यालये सुरू करा, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून होत होती.

या पार्श्वभूमीवर उच्च व तंत्रशिक्षण विभागाने दि. 15 फेब्रुवारीपासून महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय घेतला. यानुसार मुंबई विद्यापीठाने दि. 3 रोजी मुंबई विद्यापीठाशी संलग्नीत सर्व महाविद्यालयांचे प्राचार्य, संचालक व मान्यता प्राप्त संस्था यांना स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांच्याशी विचारविनिमय करून महाविद्यालये सुरु करण्याबाबत निर्णय घेण्याचे कळवले होते. दि. 9 रोजी महापालिकांना पत्र पाठवले होते. मात्र, त्यांच्याकडून कोणतेही आदेश प्राप्त झाले नाहीत. दि. 12 रोजी सर्व महाविद्यालयांना पुन्हा पत्र पाठवून स्थानिक प्रशासनाकडून पुढील आदेश प्राप्त होत नाहीत तोपर्यंत महाविद्यालये सुरू करता येणार नाहीत, असे कळवले.

सोमवारी सकाळी जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांना प्राध्यापक व कर्मचारी यांची कोरोना चाचणी केल्यावरच महाविद्यालय सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे महाविद्यालय सुरू होण्याचा मुहूर्त लांबणीवर पडला आहे. जिल्ह्यातील महाविद्यालयांमध्ये सरकारच्या नियमांप्रमाणे कोरोना प्रतिबंधासाठी इमारत, वर्गाची स्वच्छता, सॅनिटायझेशनची व्यवस्था, शरीराचे तापमान मोजण्याची व्यवस्था, अंतर राखून वर्गातील बैठक व्यवस्था आदी कामे अंतिम टप्प्यात आहेत.