रत्नागिरी:- महावितरणच्या कंत्राटी कर्मचाऱयांनी आंदोलनाचा आता तीव्र पवित्रा घेतला आहे. आपल्या न्याय मागण्यांसाठी कर्मचार्यांनी 48 तासांची मुदत दिली आहे. त्या मागण्या मान्य न केल्यास बेमुदत कामबंदचा इशारा महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ आणि महाराष्ट्र राज्य वीज मंडळ कंत्राटी कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्यावतीने देण्यात आला आहे.
कंत्राटी कर्मचार्यांच्या कृती समिती च्यावतीने एकूण 24 विविध वीज संघटनांनी एकत्रितपणे राज्यस्तरावर कंत्राटी वीज कामगारांच्या दृष्टीने आंदोलन छेडले आहे. याचाच एक भाग म्हणून रत्नागिरी महावितरण परिमंडल कार्यालयाबाहेर जिल्हाध्यक्ष जयेंद्र धुळ यांच्या नेतृवाखाली बुधवारी हे आंदोलन पुन्हा सुरू करण्यात आले. प्रमुख मागण्यांसाठी सुरू करण्यात आलेल्या या आंदोलनात रत्नागिरी जिल्हाभरातील सुमारे 500 कंत्राटी कर्मचारी सहभागी झालेले आहेत. अरे कोण म्हणत देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही….पक्कड लेके हल्लाबोल… हमारी युनियन हमारी ताकद अशा गगनभेदी घोषणा देत अगदी ढोलकीच्या तालावर या कर्मचाऱयांनी महावितरणच्या रत्नागिरी मंडल कार्यालयाबाहेर जणू गजर केला.
यावेळी मागण्या मान्य करण्यासाठी 48 तासांची मुदत या कर्मचारी कृती समितीने दिलेली आहे. मागण्या मान्य न झाल्यास 5 मार्च पासून बेमुदत काम बंद धरणे आंदोलनाचा इशारा महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ आणि महाराष्ट्र राज्य वीज मंडळ कंत्राटी कामगार संघटना संयुक्त समितीने दिला आहे.
महावितरण, महापारेषण या तिन्ही वीज कंपन्यातील सर्व कंत्राटी कामगारांना आवश्यक असलेल्या मागण्या शासन व प्रशासन दरबारी मांडण्यात आलेल्या आहेत. मात्र याला रास्त न्याय अद्याप मिळाला नाही. वितरण व पारेषणच्या नवीन भरतीला स्थगिती देऊन आधी अनुभवी व कुशल कंत्राटी कामगारांना ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेल्या सुचनेनुसार आधी अनुभवी व कुशल कंत्राटी कामगारांना वयात सवलत व विशेष प्राधान्य व आरक्षण द्यावे. भ्रष्ट कंत्राटदारांना व त्यांना पाठीशी घालणाऱया अधिकाऱयांवर कठोर कारवाई करावी. ऊर्जामंत्री व वीज कंपनी प्रशासनाने त्वरीत चर्चा करून कामगारांना न्याय द्यावा, यांसह अन्य मागण्या मांडण्यात आल्या. यावेळी महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार बहुसंख्येने उपस्थित होते.