महावितरणची रत्नागिरी शहरात साडेपाच कोटींची थकबाकी

रत्नागिरी:- रत्नागिरी शहर व परिसरातील वीज थकबाकीचा महावितरणसमोर डोंगर उभा आहे. रत्नागिरी शहरात वीज ग्राहकांकडून येणे असलेली थकबाकीची रक्कम 5 कोटी 42 लाख रुपयांच्या घरात पोहोचली आहे. सुमारे 57 हजार ग्राहक असलेल्या रत्नागिरी शहरात 15 हजार स्मार्ट मीटर बसविण्यात आले आहेत. असे असताना वीज थकबाकीचा आकडा वाढत असल्याने महावितरणची वसुलीसाठी चिंता वाढली आहे.

महावितरणने रत्नागिरी शहरातील ग्राहकांना वीज बिलांची अचूकता आणि पारदर्शकता आणण्यासाठी 15 हजार स्मार्ट मीटर बसवले आहेत. असे असूनही, विविध प्रवर्गातील ग्राहकांकडे मोठ्या प्रमाणात थकबाकी असल्याने ती वसुलीचे मोठे आव्हान महावितरणसमोर उभे आहे. घरगुती 7,096 ग्राहकांकडे 1 कोटी 18 लाख रु., वाणिज्य (व्यावसायिक) 1,676 ग्राहकांकडे 59 लाख रु., औद्योगिक 82 ग्राहकांकडे 7 लाख 88 हजार रु., सरकारी 169 ग्राहकांकडे 22 लाख 18 हजार रु. थकबाकी असल्यो सांगण्यात येत आहे.

रत्नागिरी नगर परिषद आणि नजीकच्या ग्रामपंचायत क्षेत्रातील थकबाकीचा आकडा चिंताजनक आहे. एकूण 2 कोटी 95 लाख रुपये पथदीपांची वीजबिल भरणा थकीत आहेत. त्यामध्ये रत्नागिरी नगर परिषद (स्ट्रीट लाईट): 2 कोटी रुपयांची मोठी थकबाकी. लगतच्या ग्रामपंचायती (शिरगाव, मिर्या, नाचणे, कुवारबाव, मिरजोळे इत्यादी): एकूण 95 लाख रुपयांची थकबाकी असल्याचे महावितरणकडून सांगण्यात येत आहे. या ग्रामपंचायत क्षेत्रांमध्ये एकूण 2,305 वीज ग्राहक आहेत, ज्यांची थकबाकी देखील लवकरच वसूल होणे आवश्यक आहे.

रत्नागिरी शहर व लगताया ग्रामपांयतमधील ही एकूण थकबाकी 5 कोटी 42 लाख रुपये इतकी प्रचंड आहे. महावितरणने स्मार्ट मीटर बसवूनही ग्राहकांनी वीज बिल भरण्यात दाखवलेली उदासीनता गंभीर आहे. वीज पुरवठा खंडित करण्याची आणि थकबाकी वसुलीसाठी कठोर मोहीम राबवण्याची तयारी महावितरण करत असल्याचे सांगण्यात येत आहे.