रत्नागिरी:- नवीन वीजजोडणीसाठी पायाभूत सुविधांची उभारणी करणे आवश्यक असल्यास ती महावितरणकडून करण्यात येईल. त्यासाठी ग्राहकास कोणताही खर्च करावा लागणार नाही. नवीन ग्राहकांना केवळ सेवा जोडणी शुल्क व सुरक्षा ठेव रक्कम भरावी लागेल. याकरिता महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने निर्धारीत केलेल्या कृती मानकांनुसार कालमर्यादेचे पालन केले जाईल, असे महावितरणकडून स्पष्ट करण्यात आले आहे. नुकतेच महावितरण मुख्यालयाने परिपत्रकाद्वारे यासंदर्भात क्षेत्रिय कार्यालयांना निर्देश दिलेले आहेत.
महावितरणच्या खर्चातून पायाभूत सुविधा उभारणीव्दारे वीज जोडणी मिळणे, हा ग्राहकांचा हक्क असल्याने व त्या हक्कापासून ग्राहक वंचित राहू नयेत, या हेतूने महावितरणने दि.20.12.2023 रोजी नवे परिपत्रक अंमलात आणले आहे. सर्व अकृषक ग्राहकांना नवीन वीजजोडणी देण्यासाठी परिपत्रकातील मार्गदर्शक तत्वांचे पालन करण्याचे निर्देश क्षेत्रिय कार्यालयांना दिले आहेत. नवीन वीज जोडणी देण्यासाठी पायाभूत सुविधा उभारणीचा आवश्यक तो खर्च महावितरणच्या एनएससी योजनेतून करण्यात येणार आहे. ग्राहकांना केवळ सेवा जोडणी शुल्क व सुरक्षा ठेव रक्कम भरावी लागेल. ग्राहक नॉन डीडीएफ योजनेचा देखील पर्याय निवडू शकतो. अशा ग्राहकास काम पुर्णत्वानंतर मासिक वीजदेयकातून पाच समान हप्त्याव्दारे खर्च रकमेचा परतावा दिला जाईल. ग्राहकास फक्त स्वत:च्या वापरासाठी विद्युत यंत्रणा उभारावयाची असल्यास समर्पित वितरण सुविधा (डीडीएफ) योजने अंतर्गत वीजपुरवठा करण्याचा पर्याय उपलब्ध आहे.
नवीन वीजजोडणीसाठीच्या मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोरपणे पालन व्हावे, यासाठी सक्षम अधिकार्यांनी कार्यक्षेत्रात विद्युत खांब, वितरण रोहित्रे, स्विचगियर्स, केबल इत्यादी पुरेशी सामग्री उपलब्ध असल्याची खात्री करावी व कोणत्याही समस्यांसाठी त्वरित संपर्क साधावा, असे संचालक (संचलन) यांनी परिपत्रकाव्दारे कळविले आहे.