रत्नागिरी:-भ्रष्टाचाराच्या, गैरवर्तनाच्या आरोप असलेल्या मंत्र्यांना पाठीशी घालणार्या आणि शेतकरी, एसटी कर्मचारी, एमपीएससी चे विद्यार्थी अशा अनेक समाजघटकांच्या न्याय्य मागण्यांकडे दुर्लक्ष करणार्या महाविकास आघाडी सरकारचा पापाचा घडा भरला आहेत. अशा बिनकामाच्या सरकारचा जनता जनार्दनच योग्य वेळी निकाल लावेल, अशी टीका भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष आमदार प्रसाद लाड यांनी पत्रकार परिषदेत केली.
या पत्रकार परिषदेला जिल्हाध्यक्ष अॅड.दीपक पटवर्धन, जिल्हा प्रभारी प्रमोद जठार, जिल्हा सरचिटणिस सचिन वहाळकर, अॅड. विलास पाटणे, तालुकाध्यक्ष मुन्ना चंवडे, जिल्हा प्रसिद्धीप्रमुख उमेश कुळकर्णी आदी उपस्थित होते.
श्री .लाड यांनी सांगितले की, भ्रष्ट मंत्र्यांचं ओझं वाहणारं अत्यंत अकार्यक्षम, बेपर्वा सरकार असे आघाडी सरकारचं वर्णन करावं लागेल. गृहमंत्रीपद भूषविणार्या मंत्र्याला पोलीस अधिकार्यानेच 100 कोटी वसुलीचा आरोप झाल्यानंतर राजीनामा देणे भाग पडले तर दुसर्या मंत्र्याला तरुणीच्या आत्म्यहत्येला जबाबदार असल्याचा आरोप झाल्याने मंत्रीपद सोडणे भाग पडले. परिवहन मंत्र्याची अंमलबजावणी संचालनालयाकडून चौकशी सुरु आहे. उपमुख्यमंत्र्यांशी संबंधित व्यक्तींची, संस्थांची आयकर विभागाकडून बेहिशोबी मालमत्तेबद्दल चौकशी सुरु आहे. समाज कल्याण मंत्र्यांवर एका महिलेने बलात्काराचा आरोप केला. गृहनिर्माण मंत्री आव्हाड यांना एका तरुणाच्या मारहाणप्रकरणी अटक करण्यात आली. खुद्द मुख्यमंत्र्यांनी आपल्या उमेदवारी अर्जात मालमत्तेबाबत माहिती दडविली असल्याची तक्रार निवडणूक आयोगाकडे करण्यात आली आहे. एका व्यापार्याच्या हत्येप्रकरणी तत्कालीन पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्यावर विधिमंडळात पुराव्यानिशी आरोप झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी वाझे यांचे समर्थन केले होते.
आघाडी सरकारने शेतकरी, एसटी कामगार, एमपीएससीचे विद्यार्थी, आरोग्य विभागाच्या परीक्षांना बसणारे विद्यार्थी अशा अनेक घटकांच्या रास्त मागण्यांबाबत बेफिकिरी दाखवत कुशासन कसे असते याचे प्रात्यक्षिकच सादर केले. आर्यन खानची सुटका केव्हा होईल याची काळजी करत बसलेल्या आघाडीच्या मंत्र्यांना एसटी कर्मचारी आत्महत्या करताहेत याचे सोयरसुतक नाही. अतिवृष्टीचा फटका बसलेल्या शेतकर्यांची विचारपूस करण्याची माणुसकीही या सरकारच्या मंत्र्यांनी दाखविली नाही. अतिवृष्टीग्रस्त शेतकर्यांना हेक्टरी अवघी 10 हजारांची मदत देऊन राज्य सरकारने शेतकर्यांची क्रूर थट्टा केली. एमपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या वेदना जाणून घेण्याची संवेदनशीलताही या सरकारला दाखविता आली नाही. आरोग्य विभागाच्या भरती परीक्षा आयोजनात प्रचंड गोंधळ घातले गेले. वेगवेगळे समाज घटक आपल्या न्याय्य मागण्यांसाठी करत असलेला आक्रोशही या सरकारच्या कानावर जात नाही. अशा सरकारच्या पापाचे घडे भरले असून सामान्य मतदार या सरकारचा योग्य वेळी निकाल लावेल, असेही त्यांनी नमूद केले.