रत्नागिरी:- दसरा-दिवाळीच्या पार्श्वभूमीवर गेल्या महिनाभरात महारेराने रत्नागिरी जिल्ह्यातील बिल्डरांच्या ९ गृहनिर्माण प्रकल्पांना मंजुरी दिली आहे. चिपळूणमधील अनेक प्रकल्प ब्लू आणि रेडलाईनमध्ये अडकले आहेत. तरीही महारेराने दसऱ्यापूर्वी इतक्या मोठ्या प्रमाणावर गृहप्रकल्पांना नोंदणी क्रमांक देण्याची ही पहिलीच वेळ असावी. यामध्ये दसऱ्याच्या मुहूर्तावर सुरू होणारे, मुदतवाढ दिलेले आणि काही सुधारणा केलेल्या गृहप्रकल्पांचा समावेश आहे.
दिवाळीच्या पार्श्वभूमीवरही कायदेविषयक, तांत्रिक आणि आर्थिक निकषांची पूर्तता करणाऱ्या प्रकल्पांना महारेराने मंजुरी दिली आहे. वर्षभर ही प्रक्रिया सुरू असते; मात्र दसरा, दिवाळीच्या मुहूर्तावर गृहनिर्माण प्रकल्प सुरू करण्याची, घोषित करण्याची परंपरा रिअल इस्टेट क्षेत्रात आहे. हे वर्षही त्यास अपवाद नाही. महारेरा लागू झाल्यापासून जिल्ह्यातील सर्वच बिल्डर त्या अंतर्गत नोंदणी करून गृहनिर्माण प्रकल्प बांधत आहेत.
चिपळूणमधील गृहनिर्माण प्रकल्प उभारण्याची गती २०२१च्या महापुरापासून मंदावली आहे. रेडलाईन आणि ब्लूलाईन या दोन रेषा नद्यांच्या काठी बांधकाम करण्यासाठी खूप महत्त्वाच्या मानल्या जातात. रेड लाईन आणि ब्लू लाईनच्या आत बांधकाम करण्यास परवानगी नसते कारण, अशा ठिकाणी पूर येण्याचा धोका जास्त असतो. २०२१ मध्ये महापूर आल्यानंतर शहरात ब्लू आणि रेडलाईनची रेषा मारण्यात आली. त्यामुळे शहर आणि उपनगरातील निम्म्या भागाचे गृहनिर्माण प्रकल्प थांबले आहेत. काही जुने प्रकल्प थांबले होते. तेही सुरू झालेले नाही.
चिपळूणमध्ये महापुरावर उपाययोजना सुरू आहेत. शहरात पाणी भरत असले तरी फारसे नुकसान होत नाही. शहराचा विस्तार होणे गरजेचे आहे. त्यासाठी नव्या ठिकाणी गृहनिर्माण प्रकल्प बांधण्याची परवानगी आवश्यक आहे. शासनाने निळी आणि लाल रेषा रद्द करावी, असे आम्ही म्हणत नाही किमान त्यात सुधारणा करून विकासाला वाव द्यावा, असे बांधकाम व्यावसायिक राजेश वाजे यांच्याकडून सांगण्यात आले.