रत्नागिरी:- देशभरातील लाखो वीज कामगार, अभियंते व आऊसोर्सिंग कामगार केंद्र सरकारच्या वीज जगाचे खासगीकरण करण्याच्या धोरणाविरोधात महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनतर्फे दि.१२ मार्च रोजी देशभरात निदर्शने करण्यात येणार असल्याची माहिती फेडरेशनचे अध्यक्ष काॅ.मोहन शर्मा यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली.
ऑल इंडिया फेडरेशन ऑफ इलेक्ट्रिसिटी एम्पलाॅईज या राष्ट्रीय पातळीवरील वीज उद्याेगातील कामगार संघटनेचे राष्ट्रीय अधिवेशन हैद्राबाद येथे झाले. त्यावेळी महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रीसिटी वर्कर्स फेडरेशनचे पदाधिकाऱ्यांसह देशातील २८ राज्यातील व केंद्रशासित प्रदेशातील वीज उद्योगात कार्यरत कामगार संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. या अधिवेशनात विविध राज्य सरकारच्या वीज उद्योगाचे खासगीकरण करण्याच्या विरोधात निदर्शने करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. देशातील सार्वजनिक उद्योगाचे खासगीकरण बंद करा, सुधारीत विद्युत कायदा २०२२ वापस घ्या, देशातील सरकारच्या मालकीच्या वीज कंपन्यांमध्ये सुरू केलेले फ्रेचांईशी, समांतर वीज वितरणाचा परवाना देण्याचे धोरण रद्द करा, देशातील सरकव्च्या मालकीच्या वीज कंपन्यांमध्ये सुरू असलेले फ्रेचांईशी, समांतर वीज वितरणाचा परवाना देण्याचे धोरण रद्द करा, शंभरच्या वर रद्द केलेले कामगार कायदे बहाल करा, उत्तरप्रदेशातील कामावरून काढून टाकलेल्या ३००० कंत्राटी कामगारांना परत कामावर घ्या, सर्व कंत्राटी/बाह्यस्त्रोत कामगारांना नियमित करा, देशभरातील वीज कामगारांना जुनी पेन्शन योजना लागू करा, वीज कंपन्यांतील मंजूर रिक्त पदे तात्काळ भरा. समान काम समान वेतनाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची अंमलबजावणी करा देशभरातील वीज ग्राहकांना स्मार्ट मीटर लावण्याचे धोरण बंद करून वीज ग्राहकाच्या हिताचे संरक्षण करा, प्रामुख्याने या मागण्यांकडे महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनने निदर्शनाचा निर्णय घेतला आहे. शासनाने या निदर्शनाची दखल घेतली नाही तर आंदोलनाची पुढील दिशा निश्चित करण्यात येणार असल्याचे काॅ. शर्मा यांनी सांगितले.
यावेळी फेडरेशनचे सरचिटणीस कृष्णा भोयर, अतिरिक्त सरचिटणीस महेश जोतराव, उपसरचिटणिस सल्लाउद्दीन नाकाडे, उपाध्यक्ष भीमाशंकर पोहेकर, काॅम्रेड अरूण मस्के, एस.एम फराकटे, महिला आघाडी अध्यक्ष भारती भोयर, सेवानिवृत्त संघटना प्रमुख एम.आर.जाधव, कल्याणी ट्रस्ट विश्वस्त जी.आर. पाटील, राहुल शिनकर, महेश डिंगणकर, विजय शिंदे उपस्थित होते.









