महायुतीत राजकीय भूकंप; भाजपच्या 57 प्रमुख पदाधिकाऱ्यांचे राजीनामे

‘नैसर्गिक युतीत’ अन्याय झाल्याची भावना; तिकीट नाकारल्याने कार्यकर्त्यांचा एल्गार

रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचे वारे वाहू लागले असतानाच, सत्ताधारी महायुतीमध्ये मोठा स्फोट झाला आहे. रत्नागिरी तालुक्यातील राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या कुवारबाव पंचायत समिती गटात भारतीय जनता पार्टीला तिकीट नाकारल्याने आणि नैसर्गिक युतीत अन्यायकारक वागणूक मिळाल्याच्या भावनेतून भाजपच्या तब्बल ५७ प्रमुख आणि सक्रिय पदाधिकाऱ्यांनी आपले सामूहिक राजीनामे दिले आहेत. या घटनेमुळे रत्नागिरीच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

कुवारबाव पंचायत समिती गटावर भाजपचा दावा होता. मात्र, महायुतीच्या जागावाटपात ही जागा भाजपला सुटली नाही किंवा अपेक्षित उमेदवाराला तिकीट नाकारण्यात आले. यामुळे नाराज झालेल्या गांनी आक्रमक पवित्रा घेतला. या गटाताल एकण ५८० सकिय कार्यकर्ते आाणि पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदांचे राजीनामे भाजपचे तालुकाध्यक्ष यांच्याकडे सुपूर्द केले आहेत.

राजीनामा देताना नाराज कार्यकर्त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. “आम्ही यापुढे भाजपच्या कोणत्याही संघटनात्मक कार्यात सहभागी होणार नाही. आम्ही पक्षाचे फक्त ‘शुभचिंतक’ आणि ‘मतदार’ म्हणून राहू,” असे त्यांनी जाहीर केले आहे. महायुतीतील अंतर्गत कलह आणि स्थानिक पातळीवर होणारा अन्याय यामुळे हा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले.

याबाबत तालुकाध्यक्ष प्रतीक देसाई यांनी स्पष्ट केले की, “मी फक्त हे राजीनामे स्वीकारले आहेत. कार्यकर्त्यांच्या भावना आणि हे राजीनामे राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा प्रदेशाध्यक्ष श्री. रवींद्र चव्हाण आणि खासदार श्री. नारायण राणे यांच्याकडे पाठवले जातील.”

कुवारबाव हा रत्नागिरी शहराजवळील अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर ५७ सक्रिय पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिल्याने भाजपसमोर आणि पर्यायाने महायुतीसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. या असंतोषाचा फायदा विरोधकांना होणार का? आणि वरिष्ठ नेते ही बंडखोरी थंड करण्यात यशस्वी ठरणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.