महायुतीत आगाऊपणा करणाऱ्यांना थांबवण्याची ताकद हवी: ना. सामंत

भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी समन्वय समितीची बैठक संपन्न

रत्नागिरी:- महायुती म्हणून राजकीय वैरी कोण हे आपण ठरवत नाही, तोपर्यंत आपण चांगले काम करू शकत नाही. तिन्ही पक्षांनी एकदिलाने काम केल्यास सर्व निवडणुकांमध्ये आपली बाजी असेल. आगाऊपणा करणाऱ्यांना थांबवण्याची ताकद हवी. मी जरी चुकलो तरी सांगायला पाहिजे. हेवेदावे बाजूला ठेऊन नरेंद्र मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी मिशन ४८ हे ध्येय्य उराशी बळगले पाहिजे. आता महायुती म्हणून एका गाडीतून फिरले पाहिजे. आजपासून माझा रत्नागिरीत किंवा जिल्ह्यात जो कार्यक्रम असले त्याला महायुतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांना निमंत्रण असले, अशी स्पष्ट भुमिका मुख्य समन्वयक आणि जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी मांडली.

भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या समन्वय समितीची महत्त्वाची आणि पहिली बैठक आज विविक हॉटेलमध्ये झाली. यावेळी भाजपचे समन्वयक प्रमोद जठार, शिवसेनेचे सदानंद चव्हाण, राष्ट्रवादीचे आमदार शेखर निकम यांच्यासह तिन्ही पक्षाच्या महिला संघटक आणि प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तिन्ही पक्षाच्या समन्वयकांनी एकजुट ठेऊन ग्रामपंचायत ते खासदारकीच्या निवडणुका महायुती म्हणून लढण्याचा निर्णय घेतला. लवकरच महायुतीचा प्रमुख पदाधिकाऱ्यांचा मेळावा संक्रातीदिवशी (ता.१४) रत्नागिरीत होणार आहे. याला प्रमुख ३ हजार समन्वयक उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे सर्व कटुता बाजूला ठेऊन प्रत्येकाने तिळगुळ नाही मिळाले तरी एकमेकांशी गोड बोलुन महायुती मजबूत करायचे आवाहन केले.

उदय सामंत म्हणाले, नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी मिशन 48 घेऊन पुढे जायचे आहे. यामध्ये लोकसभेचे रत्नागिरी-सिंधुदुर्ग आणि रायगड हे दोन्ही मतदारसंघाचा समावेश असणार आहेत. या बैठकीमुळे महायुतीची ताकद बळकट झाली आहे. ग्रामपातळीपर्यंत चांगला समन्वय ठेवायचा आहे. राज्यात समित्या तयार झाल्या. महाराष्ट्र जसे वातावरण आहे तसे सकारात्मक वातावरण आपण स्थानिक पातळीवर ठेवले पाहिजे. तिळगुळ नसतानाही गोड बोलू. विचार वेगळे असेल तरी मिशन एकच आहे. आजची वेळ चांगली परंतु मिशन ४८ नव्हे तर मिशन 215 सुद्धा आपल्या समोर आहे. आपल्यातले मैत्रिपुर्ण संबंध अधिकदृढ झाले पाहिजेत. जिल्हा परिषदेच्या 56 गटात आपण जाऊन पक्षीय काम करू. एकमेकांच्या तंगड्यात ओढण्यापेक्षा एकमेकाला हात देऊ.

लोकसभेच्या उमेदवारीवरून नारायण राणे आणि माझ्यात गैरसमज झाला होता. परंतु आम्ही तो बोलुन दुर केला. कारण इच्छुक कोणीही असू शकते. परंतु उमेदवार देण्याचा अधिकारी तिन्ही पक्षांच्या वरिष्ठांना आहे. परस्पर तिकीट वाटू नका. कोणी आपल्या महायुतीबद्धल बोलल्यास आपली भुमिका मांडण्यासाठी समिती हवी. एकत्र नसल्याने काहीलोक फायदा घेत आहेत. त्यात नुकसात तिन्ही पक्षांचे होणार आहे. परंतु आपण एक झालो तर अनेक जण पक्षात येतील. राजापूर महयुतीचा बालेकिल्ला आहे, हे परवाच्या आमच्या मेळाव्यानंतर स्पष्ट झाले. एकत्र बसताना खुल्या मनाने बसा. भविष्यातील दोन्ही खासदार आणि जिल्ह्यातील पाच आमदार महायुतीचेच असतील असे ना. सामंत म्हणाले.