महामार्ग कामाबाबत आंदोलन केल्याप्रकरणी मुन्ना देसाई, पर्शुराम कदमांसह तिघांवर गुन्हा

रत्नागिरी:- मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील निवळी तिठा येथे पुलाचे काम, सर्व्हिस रोड आणि बोगद्याच्या विविध मागण्यांसाठी जमाव जमवून आंदोलन करणे माजी सभापती पर्शुराम कदम यांच्यासह तिघांना महागात पडले आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या मनाई आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, २५ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास निवळी तिठा येथे हे आंदोलन झाले. राष्ट्रीय महामार्ग क्र. ६६ वरील निवळी गावातील पुलाचे काम, सर्व्हिस रोड आणि बोगद्याबाबत स्थानिकांच्या विविध मागण्या आहेत. या मागण्यांसाठी सुमारे २० ते २५ ग्रामस्थांना एकत्र जमवण्यात आले होते. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करून भाषणे करण्यात आली.

​रत्नागिरीचे जिल्हाधिकारी यांनी १८ मार्च रोजीच्या आदेशानुसार, १९ मार्च ते २ एप्रिल २०२६ या कालावधीत जिल्ह्यात महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७(१), (३) अन्वये मनाई आदेश लागू केला आहे. या आदेशानुसार ५ पेक्षा जास्त व्यक्तींनी एकत्र येणे किंवा सभा-आंदोलन करण्यास बंदी आहे. या आदेशाचे उल्लंघन झाल्याचे समोर आल्यानंतर पोलिसांनी कायदेशीर कारवाई केली आहे.

​रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस हवाल्दार परेश रघुनाथ भिसे यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून पर्शुराम मारुती कदम (रा. हातखंबा), मुन्ना देसाई ऊर्फ केदार मधुसूदन देसाई (रा. हातखंबा), राजेश विनायक सावंत (रा. रत्नागिरी) या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

​या तिघांविरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ च्या कलम १३५ प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला आहे. महामार्गावरील प्रलंबित कामांमुळे स्थानिकांमध्ये असंतोष असला तरी, प्रशासकीय नियमांचे उल्लंघन केल्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे.