महामार्गावर पेट्रोल टँकर पलटी होऊन वाहतूक २ तास ठप्प

रत्नागिरी:- रत्नागिरी – नागपुर महामार्गावर नाणीज गावच्या हद्दीत ईरमलवाडी फाट्यानजीकच्या वळणावर पेट्रोल-डिझेलची रत्नागिरीच्या दिशेने वाहतुक करणारा टँकर पलटी होऊन अपघात झाला. यामध्ये टॅंकर चालक जखमी झाला असून टँकरमधील पेट्रोल- डिसेलसहित नुकसान झाले आहे. या अपघातामुळे पेट्रोल डिझेल महामार्गावर सांडल्याने खबरदारीचा उपाय म्हणून संपूर्ण वाहतूक दोन तास बंद ठेवण्यात आली होती.

या अपघातासंदर्भात पाली पोलिस दुरुक्षेत्रातून मिळालेल्या माहिती नुसार बुधवारी सकाळी १०.३० वाजण्याच्या दरम्यान रत्नागिरी- नागपूर महामार्गावर नाणीज गावच्या हद्दीतील इरमलवाडी फाट्यानजीकच्या वळणावर सांगली ते रत्नागिरी अशी पेट्रोल-डिझेलची वाहतुक करणारा टॅंकर (क्र. एमएच ०८ जी १३८८) हा रस्त्यावर पलटी होऊन अपघात झाला. यामध्ये टँकरचालक वैभव कृष्णाजी कुलकर्णी (४२ रा. पेठनाका, इस्लामपूर जि. सांगली) हा जखमी झाल्याने त्याला तात्काळ रुग्णवाहिकेतून पाली ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. या अपघातामुळे टँकरच्या टाकीतील पेट्रोल-डिझेल रस्त्यावर मोठ्या प्रमाणात सांडले होते. शिवाय टँकरचेही मोठ्या प्रमाणात नुकसान यात झाले आहे.

या अपघातातील पेट्रोल-डिझेल या ज्वालाग्रही पदार्थामुळे खबरदारी म्हणून महामार्गावरील वाहतुक दोन तास बंद ठेवण्यात आली होती. शिवाय महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाचा अग्निशामक बंब घटनास्थळी ठेवण्यात आला होता. या अपघाताची माहिती मिळताच तातडीने रत्नागिरी ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक मारुती जगताप, पाली दुरक्षेत्राचे सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक संतोष कांबळे, महामार्ग वाहतूक पोलिस मदत केंद्राचे सहाय्यक पोलिस निरीक्षक विक्रमसिंग पाटील, राहुल बोंद्रे, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक अशोक रावणंग, राजीव सावंत, चालक पोलिस कॉन्स्टेबल राजेश शिंदे यांनी वाहतुक व्यवस्था चोख राखली. या अपघाताची नोंद रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.